Thursday 17 January 2019

रेल्वे चाक निर्मिती

औद्योगिक कॉरीडोरमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना-अनंत गिते


       नाशिक, दि.17 - रेल्वे चाक निर्मिती व दुरुस्ती प्रकल्प आणि औद्योगिक कॅरिडॉरमुळे नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गिते यांनी  केले.
          कर्षण यंत्र कारखाना नाशिकरोड येथे रेल्वे चाक निर्मिती व दुरुस्ती प्रकल्पाच्या भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, योगेश घोलप, भुसावळ रेल्वेमंडळ प्रबंधक आर.के.यादव, कर्षण मशीन कारखान्याचे उपमुख्य प्रबंधक श्री.अग्रवाल आदी उपस्थित होते.

          श्री. गिते म्हणाले, नाशिकने विकासाच्या मार्गावर गतीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची नवी ओळख होणार असून रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी 52 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून भविष्यातील इलेक्ट्रीक रेल्वेसाठी चाकांची कमतरता येऊ नये म्हणून या प्रकल्पाची निर्मिती महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. राजधानी एक्सप्रेस नाशिक मार्गे दिल्ली येथे जाण्यासाठी 19 जानेवारी पासुन शुभारंभ होणार असून यामुळेदेखील नाशिकच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होईल, असे  त्यांनी सांगितले.
          श्री.भामरे म्हणाले, 'डिफेन्स इनोव्हेशन हब' व रेल्वे चाक निर्मिती व दुरुस्ती प्रकल्प यांच्या माध्यमातून जिल्ह्यात नवे लघुउद्योग निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन जिल्ह्याचा आर्थिक विकास देखिल साधला जाणार आहे. मुंबई-पुणे या शहरांप्रमाणेच नाशिकदेखील स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
          प्रास्ताविकात भुसावळ रेल्वे प्रबंधक आर.के. यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. कार्यक्रम प्रारंभी श्री.गिते व डॉ.भामरे यांच्या हस्ते  प्रकल्पाचे भूमीपुजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
0000

No comments:

Post a Comment