Wednesday 9 January 2019

स्मार्ट सिटी बैठक


स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्यात यावी - पालकमंत्री

       नाशिक, दि.9 - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांना गती देण्यात यावी आणि विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विविध विकासकामांचा  आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता राजेश मोरे, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील आदी उपस्थित होते.
          श्री.महाजन यांनी गोदावरी नदी किनारा सुशोभीकरण, पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरण, हरितक्षेत्रा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, शिवाजी उद्यान नुतनीकरण, शहर वाहतुक सेवा, सायकल सुविधा, रामायण सर्कीट, सार्वजनिक शौचालय, बसडेपो, कौशल्य विकास आदी विविध विकासकामांची माहिती घेतली.
 सुरु असलेली कामे वेगाने पूर्ण करुन उर्वरीत कामांसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया त्वरीत राबविण्यात यावी, असे निर्देश श्री.महाजन यांनी दिले. पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरण करतांना दर्जेदार सुविधा देण्यात याव्यात, पथदिव्यांचे कामही लवकर पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
          श्री. गमे यांनी सादरीकरणाद्वारे स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामांना गती देण्यात येत असल्याने येत्या काळात नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पातील पहिल्या दहा शहरात होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 स्मार्ट वाहनतळासाठी शहर पोलिसांच्या मदतीने 7 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून इतर 22 ठिकाणांची निश्चिती लवकरच पोलिसांच्या समन्वयाने करण्यात येईल. वाहनतळावरील रिकाम्या जागेची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात येत, असल्याची माहिती  त्यांनी दिली.
000
         
         

No comments:

Post a Comment