Thursday 17 January 2019

डिफेन्स इनोव्हेशन हब


नाशिक देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हब’-डॉ. सुभाष भामरे

            नाशिक, दि.17 - स्थानिक पातळीवर संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि उत्पादनाला चालना देण्यासाठी नाशिक येथे देशातील दुसरे डिफेन्स इनोव्हेशन हबस्थापित करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केली.
ओझर टाऊनशिप येथे आयोजित डिफेन्स इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स सेमिनारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, संरक्षण निर्मिती विभागाचे सचिव डॉ.अजय कुमार, एअर मार्शल व्ही.आर.चौधरी, भारतीय नौसेनेचे व्ही. मोहनदास, डीआरडीओचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. के. मेहता, एचएएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन, भारत फोर्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. भाटीया, संजय जाजू आदी उपस्थित होते.

डॉ.भामरे, म्हणाले, संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर देशाच्या लष्कराची क्षमता अवलंबून आहे. त्यादृष्टीने संरक्षण सामग्रीसाठी स्थानिक पातळीवर संशोधन व उत्पादन होण्यासाठी पहिले डिफेन्स हब कोईम्बतुर येथे असून दुसरे हब नाशिक येथे सुरू करण्यात येत आहे. या क्षेत्रातील सहभागीदारांना याचा लाभ होईल आणि देशांतर्गत उद्योगांनादेखील प्रोत्साहन मिळेल.

  संरक्षण उत्पादन धोरणांतर्गत 2025 पर्यंत  संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच देशात भारताला आणण्याचे35 हजार कोटी निर्यातीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सुविधा विकसीत करण्यासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी उद्योगजगताचा संरक्षण मंत्रालयाशी असणारा संवाद महत्वाचा आहे. दोघांच्या परस्पर सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील स्वयंपुर्णता आणि सिद्धतेसाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. संरक्षण क्षेत्रातील नव्या धोरणानुसार संरक्षण क्षेत्रातील भारतीय खासगी क्षेत्राच्या भागीदाराला चालना मिळण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्के करण्यात आल्याची  माहिती त्यांनी दिली.

डॉ. भामरे म्हणाले, जागतिक पातळीवर शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे स्थान होते. शस्त्रांची मागणीही वाढत आहे. लष्करी सामग्री निर्मिती क्षेत्रात स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. परेदशी उद्योगांना या बाजारातील संधी साधण्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याने देशातच शस्त्र समाग्री उत्पादनाचा प्रयत्न डिफेन्स इनोव्हेशन हबच्या माध्यमातून करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

श्री.महाजन म्हणाले, कार्यशाळेच्या  माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांना असणाऱ्या संधीबाबत चांगली चर्चा होऊन त्यातून एक आश्वासक दिशा इथल्या उद्योगक्षेत्राला मिळणार आहे. प्रगत शैक्षणिक संस्थामुळे मिळणारे कुशल मनुष्यबळ, विमानसेवा, मुंबई- आग्रा महामार्ग, रेल्वेमार्ग, धरणांमुळे असणारी पाण्याची उपलब्धता असल्याने नाशिकचा विकास आणि विस्तार वेगाने होत आहे. 'डिफेन्स इनोव्हेशन हब' वेगवान विकासासाठी  उपयुक्त ठरणार आहे. देशाच्या संरक्षण सिद्धतेत नाशिकचे यापुढे योगदान राहणार आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब त्यांनी सांगितले. हबमुळे स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ.भामरे यांनी 'डिफेन्स इनोव्हेशन हब’ स्थापन होत असल्याची घोषणा केली.  संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या सरकारी उद्योगांमार्फत आयोजित  प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली. एचएएल, बेल,बीडीएल, एमडीएल, जीएसएल, बीएईएमएल, मिधानी सारख्या संस्थानी आपली उत्पादने प्रदर्शित केली होती. त्याचबरोबर ओएफबी, डीआरडीओ, भारतीय लष्कराचे विविध विभाग, नौसेना आणि वायुसेनेतर्फेदेखील आपल्या उत्पादन आणि सेवेचे प्रदर्शन याठिकाणी करण्यात आले होते.
0000

No comments:

Post a Comment