Friday 11 January 2019

‘गाळमुक्त धरण’ कार्यशाळा


‘गाळमुक्त धरण’ अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन

          नाशिक, दि.11-‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या बीजेएसकार्यपद्धतीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातार्फे  नाईस सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, प्रकल्प अधिकारी कुमार आशिर्वाद, बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वराडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अवर सचिव ताशिलवार, बीजेएसचे जिल्हा समन्वयक नंदकुमार साखला, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यासाठी बीजेएसचे सहकार्य लाभणार आहे. या संस्थेकडून मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री मिळणार असल्याने ही मोठी संधी समजून यंत्रणांनी अधिक प्रयत्न करावे व योजनेच्या अंमलबजावणीत प्रथम क्रमांकावर आणावा, असे आवाहन श्री.राधाकृष्णन यांनी केले.
अभियान राबविताना प्रस्ताव मान्यता प्रक्रीया वेगाने करणे तसेच लोकसहभाग वाढविणे या बाबींवर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

श्री.वराडे यांनी सादरीकरणाद्वारे बीजेएस पॅटर्नची माहिती दिली. लोकसहभाग वाढविण्याचे प्रयतन केल्याने आणि प्रस्तावाची मान्यता प्रक्रीया वेगवान केल्याने बुलडाणा जिल्हा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर राहीला, असे त्यांनी सांगितले.

श्री.ताशिलवार यांनी अभियानाची माहिती दिली. अभियानासाठी यंत्र सीएसआरमधून, इंधन शासनाकडून आणि वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून करावयाचा आहे. राज्यात काढलेल्या  एक कोटी 90 लाख घनमीटर गाळापैकी 50 लाख घनमीटर गाळ बुलडाण्यात काढण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. बुलडाणा जैन समाजाप्रमाणे नाशिक जिल्हा युवा मित्र संघटनेने दत्तक घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलडाणा येथील उप अभियंता क्षितीजा गायकवाड यांनी जलसंपदा विभागाने केलेल्या कामाचे सादरीकरण केले. कार्यशाळेला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच कृषी व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
----

No comments:

Post a Comment