Saturday 10 June 2017

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वर्धापन दिन

वैद्यकीय क्षेत्रातील अध्ययनासोबत सेवाभावनेने काम करा-ई.वायुनंदन

ना‍शिक दि. 10-वैद्यकीय क्षेत्रासंबंधीत जनतेच्या मनात असणारा आदर आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी अध्ययनासोबत सेवाभावनेने कार्य करा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी केले.
          महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकाणिसाव्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, आमदार डॉ.राहुल आहेर, प्रतिकुलगुरू डॉ.मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण, अधीष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, डॉ.सतीश डुंबरे, डॉ.विरेंद्र कविश्वर आदी उपस्थित होते.

          श्री.वायुनंदन म्हणाले, महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात ग्रामीण भागात आरोग्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्राकडे आदर्श सेवाकार्य म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय शिक्षणाचा लाभ देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात चांगली सेवा देणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          डॉ.म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला प्राधान्य दिले आहे. संशोधन प्रकाशन करणे सुलभ व्हावे यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी एकूण दोन कोटींची  तरतूद करण्यात आली आहे.  याचा लाभ घेऊन संशोधन प्रकल्प विद्यापीठाकडे सादर करावा, असे आवहान त्यांनी केले.

          विद्यापीठाने पदव्युत्तर संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्याचबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, फिजीओथेरेपी अभ्यासक्रमाची पदवी महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी आवश्यक सुचना पाठवून प्राध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

          यावेळी मान्यवरांच्या हस्ते वैद्य राजपाल शंकरराव पाटील आणि वैद्य मीरा मधुकर परांजपे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परीक्षा विभाग सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण विभागाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
          कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.खामगावकर यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी डॉ.देशमुख, श्री.पाटील आणि श्रीमती परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले.

------

No comments:

Post a Comment