Monday 26 June 2017

ग्रामीण रुग्णालय भेट

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढविणार-डॉ.दिपक सावंत


नाशिक दि.26 -  आदिवासी भागातील रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन तज्ज्ञ डॉक्टर्स नियुक्त करण्यात येतील, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी केले.
डॉ.सावंत यांनी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय आणि बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आमदार जीवा पांडू गावीत, आरोग्य उपसंचालक डॉ.लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे आदी उपस्थित होते.
डॉ.सावंत म्हणाले, रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सुरगाणा येथे 50 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत उभी करण्यात येईल. रुग्णालयात फिजीशीअन, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूल तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येईल. आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखापर्यंत पगार वाढवून त्यांना शासनातर्फे विशेष प्रोत्साहन  देण्यात येईल.  रुग्णालयात एक्स-रे यंत्र कार्यरत करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.सावंत यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत  शुक्रवारी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल त्वरीत शासनास पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. आदिवासी भागात सॅम आणि मॅमचे प्रमाण कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

-------

No comments:

Post a Comment