Friday 30 June 2017

चार कोटी वृक्ष लागवड

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
जिल्ह्यात 44 लाख वृक्ष लागवड होणार

          नाशिक 30 – राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान आयोजित चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात 44 लाख 13 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
वन विभागाने वृक्ष लागवडीसाठी तयारी पूर्ण केली असून खड्डे खोदण्याचे कामदेखील पुर्ण झाले आहे. एकूण वृक्ष लागवडीपैकी वन विभाग 194 ठिकाणी 34 लाख 89 हजार, ग्राम पंचायत 1314 ठिकाणी 5 लाख आणि इतर शासकीय यंत्रणा 3101 ठिकाणी 4 लाख 18 हजार वृक्ष लागवड करणार आहे. वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या 86 रोपवाटीकेत 1 कोटी 12 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमानंतर उरणारी रोपे पुढील वर्षाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात उपयोगात आणली जाणार आहेत.

नागरिकांना वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘My Plants’ या मोबाईल ॲप्लिकेशनवर तसेचरोपे आपल्या दारीउपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड आणि चांदवड येथील 12 ठिकाणी कक्ष उभारून नागरिकांना रोपे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 1926 क्रमांकावरदेखील नागरिकांना नोंदणी करता येईल.

वृक्ष लागवडीसाठी हरितसेना सदस्य नोंदणी सुरू असून वनविभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 99 हजार 764 नोंदणी करण्यात आली आहे. विभागातील ही सर्वाधिक नोंदणी आहे.
गतवर्षी दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकूण 29 लाख 29 हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी वन विभागाने लावलेली 90 टक्के तर इतर यंत्रणांनी लावलेली 75 टक्के जिवंत रोपांची टक्केवारी आहे. नागरिकांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील वृक्ष लागवड कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरण रक्षणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केले आहे.
-----

No comments:

Post a Comment