Friday 2 June 2017

लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण’

लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण’


जिल्ह्यात पाणी टंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून  ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ योजना राबविण्यात येत असून योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध प्रकल्पातून  सहा लाख 78 हजार घनमीटर गाळ  काढण्यात आला आहे.
महाराष्ट्र दिनापासून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी लोकसहभाग घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गाळ वाहण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत.

गाळ काढण्याची 207 कामे सुरु करण्यात आली आहेत. त्यातील 65 कामे शासकीय यंत्रणेमार्फत तर 142 कामे लोकसहभागातून करण्यात येत आहेत.
 शासकीय यंत्रणेमार्फत एक लाख 53 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यासाठी शासनाने यंत्रासाठी केवळ इंधनाचा खर्च केला. तर लोकसहभागातून 5 लाख 25 हजार घनमीटर गाळ संपर्णूपणे लोकसहभागातून काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी यासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग दिला आहे.  गाळ काढण्यासाठी 196 जेसीबी यंत्रांचा उपयोग करण्यात येत असून त्यासाठी औद्योगिक  आणि सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.  सर्वाधिक काम सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात झाले आहे.

गाळ काढून 9 हजार 769 मीटर क्षेत्रात रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले आहे. गाळ काढण्यात आलेल्या जमिनीचे एकूण क्षेत्र 482 हेक्टर आहे. त्यापैकी सर्वाधिक 108 हेक्टर क्षेत्र चांदवड तालुक्यातील आहे. गाळ काढण्याच्या कामाची एकूण किंमत 2 कोटी 39 लक्ष असून त्यातील 1 कोटी 95 लक्ष किमतीची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत.
काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. एकूण 59 कामे पुर्ण झाली आहेत. या कामांमुळे धरणांमधील पाणीसाठा वाढून शेताची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. काही भागातील पाणीटंचाईवरही यामुळे मात करता येणार आहे.
पेठ तालुक्यात इनामबारी येथील ल.पा.तलाव आणि कोटंबी येथील गावतळ्यातील गाव शंभर टक्के लोकसहभागातून काढण्यात आला. विशेषत: येथे आतापर्यंत लोकसहभाग फार कमी होता. मात्र ग्रामस्थांना कामाचे चांगले परिणाम दिसू लागल्याने लोकसहभाग वाढत आहे.

-----

No comments:

Post a Comment