Friday 23 June 2017

आदिवासी आश्रमशाळा उद्घाटन

दिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील -विष्णू सवरा        

नाशिक दि.23:- शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत संवेदनशील असून त्यांना स्पर्धेच्या युगात टिकता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी  केले.
          दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथील शासकिय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, आदिवासी आयुक्त  आर.जी. कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमोल येडगे, प्रभारी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, मनिषा पवार आदी उपस्थित होते.

श्री.सवरा म्हणाले,चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण देता यावे यासाठी राज्यात सुविधासंपन्न अशा 206 शासकिय आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात येणार असून  86 बांधून पूर्ण झाल्या आहेत. मुला-मुलींची वसतीगृहे, वर्गखोल्या, मैदान, बहुउद्देशिय सभागृह, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था, भोजनकक्ष आदी सर्व सुविधा या आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बोपेगावचे संकुल त्याचप्रकारचे आहे, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गरजेच्या 17 अत्यावश्यक वस्तू त्यांना वेळेवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी खर्चाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर वसतीगृहात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवासखर्च आणि पुस्तकांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे,  असे श्री.सवरा यांनी सांगीतले.
खा.चव्हाण यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळाल्यास मोठी झेप घेण्याची त्यांची क्षमता आहे, असे सांगितले.  यावेळी आ. झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रकल्प अधिकारी श्री.येडगे यांनी आदिवासी विभागाच्यावतीने करण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.

बोपेगाव येथील आश्रमशाळा 4 एकर परिसरात उभारण्यात आली आहे. 387 विद्यार्थी असलेल्या या शाळेची 20 वर्ग खोल्यांची इमारत, 40 मुलांचे व 40 मुलींची स्वतंत्र वसतीगृहे, 12 शिक्षक व 12 कर्मचाऱ्यांची , एक मुख्याध्यापकाची निवासस्थाने,  बहुउद्देशीय सभागृह आदी इमारती नव्याने बांधण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment