Saturday 1 July 2017

आपत्ती व्यवस्थापन बैठक

आपत्तीला कमी वेळेत प्रतिसाद देण्यासाठी वेगाने संदेशवहन आवश्यक
-जिल्हाधिकारी


नाशिक दि. 1 – पूरपरिस्थितीत बचाव व मदत कार्यात कमी वेळेत प्रतिसाद देण्यासाठी वेगाने संदेशवहन आवश्यक आहे. आर्मी आणि एनडीआरएफच्या पथकाने त्यानुसार तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन संबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, आर्मीचे मेजर शंतनू धर, मेजर राजेश सेमबल, एनडीआरएफचे अर्खिता जेना आणि सचिन नलावडे उपस्थित होते.
बैठकीत पूर परिस्थितीत मदत व बचाव कार्यात आर्मी आणि एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनातील समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली. आपत्तीला जलदगतीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. प्रशासनातर्फे आर्मीच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, पूरपरिस्थितीत बाधीत होणारी संभाव्य गावे, पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती याबाबत माहिती देण्यात आली. आर्मीचे 80 जवान आपत्तीच्यावेळी मदतकार्यासाठी तयार असल्याचे सेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीआरएफतर्फे आपत्तीची सुचना मिळताच प्रशिक्षित जवानांचे सुसज्ज पथक तात्काळ पुणे येथून पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
महानगरपालिकेने आपत्तीच्यावेळी मदत व पुनर्वसन केंद्रासाठी जागा निश्चित करून ठेवाव्यात. पूरपरिस्थितीत धोकेदायक स्थळावरून नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्याची कार्यवाही पोलिसांच्या सहकार्याने करण्यात यावी, अशा सूचना यावेळी श्री.राधाकृष्णन यांनी दिल्या.

महापालिकेतर्फे बोट आणि रेस्क्यु व्हॅन सज्ज ठेवण्यात आल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले. प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध साहित्याविषयी आर्मीच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. -------

No comments:

Post a Comment