Wednesday 12 July 2017

जीएसटी चर्चासत्र

जीएसटी करव्यवस्था देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक-डॉ. सुभाष भामरे


नाशिक दि.12- जागतिक स्तरावर होणारे  संशोधनाचे फायदे ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असून एकविसाव्या शतकात ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) ही नवी कर प्रणाली देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
जीएसटी आयुक्तालयात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जीएसटी आयुक्त पी.आर.शर्मा, जीएसटी आयुक्त (अपील) मनोज कृष्णा, नगरसेवक शशिकांत जाधव, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.मंगेश थेटे आदी उपस्थित होते.

डॉ.भामरे म्हणाले, केंद्र सरकारने अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले असून त्यापैकी जीएसटी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याला गुड सिम्पल टॅक्स असे संबोधले  आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंमलबाजवणीत राज्यांचा, वित्त विभागांचा, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांचा सहभाग आहे. सर्वांच्या सहकार्याशिवाय या प्रणालीची अंमलबजावणी पूर्ण होणार नाही. या नवीन करप्रणालीमध्ये व्यावसायिक आणि उद्योजकांना येत असलेल्या अडचणी, प्रश्न यांची दखल घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, जकात, व्हॅट अशा कर व्यवस्था बंद होऊन एक देश, एक कर, एक मार्केट’ असणारी नवी व्यवस्था आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन सरकार जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी तत्परतेने कार्यवाही करते आहे. यासाठी विविध व्यवसाय संघटनांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात यावे. संबंधित व्यावसायिकांच्या जीएसटी कराबाबत प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांची सोडवणूक करावी, असे निर्देशही डॉ.भामरे यांनी दिले.

याप्रसंगी आयुक्त शर्मा म्हणाले, ही फार मोठी करसुधारणा असून पाच जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या सोईसाठी एक जीएसटी आयुक्तालय स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिक व मराठवाडा विभागातील तक्रारींची सुनावणीसाठी एक जीएसटी अपील आयुक्तायल निर्माण करण्यात आले आहे. तसेच पाचही जिल्ह्यातील 25 क्षेत्रीय ठिकाणी व पाच विभागीय ठिकाणी जीएसटी सेवा केंद्रे चालू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.   
यावेळी डॉ.भामरे यांनी विविध उद्योजक-व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
चर्चासत्राला बांधकाम, किराणा, कापड, इलेक्ट्र्रॉनिक्स क्षेत्रातील व्यापारी-व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment