Wednesday 5 July 2017

सुक्ष्म सिंचन योजना

सुक्ष्म सिंचन योजनेसाठी नोंदणी अधिक सुलभ

नाशिक दि. 5:- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना सुलभतेने लाभ घेता यावा यासाठी  ऑनलाईन प्रणालीत कागदपत्रांची संख्या आणि काही टप्पे कमी करण्यात आले आहेत.
लाथार्थीने योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्यक्षात सूक्ष्म सिंचन संच बसविल्यानंतर  ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी  करून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रासह सविस्तर प्रस्ताव सादर करावयाचा आहे. ई-ठिबक आज्ञावलीद्वारे ऑनलाईन नोंदणी आणि 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.  लाभार्थीचा आधार क्रमांक हाच युजर आयडी असणार आहे.
प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही लाभधारकास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर नोंदणीकृत उत्पादक, वितरक किंवा विक्रेत्याकडून 30 दिवसात सुक्ष्म सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
अनुदान प्रस्तावासोबत सातबारा आणि 8-अ उतारा, राष्ट्रीयकृत, शेड्युल किंवा सहकारी बँकेत खाते उघडल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, सुक्ष्म सिंचन संचाचा आराखडा, अधिकृत वितरकाने स्वाक्षरीत केलेले संचाचे बील, शेतकऱ्यांने निवड केलेल्या उत्पादक कंपनीशी किंवा प्रतिनिधीशी केलेला करारनामा आदी कागदपत्रे प्रस्तावासोबत सादर करावीत.
पुर्वमान्यता मिळाल्यानंतर 30 दिवसात संच न बसविल्यास मान्यता रद्द होईल, तथापि पुन्हा अर्ज करता येईल.तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी पुर्ण केल्यानंतर अनुदानाची परिगणना करून ते बँक खात्यात ईएफटीद्वारे जमा करण्यात येईल. पुर्वमान्यतेशिवाय संच बसविल्यास अनुदान अनुज्ञेय असणार नाही.
 सुक्ष्म सिंचन बसविण्यासाठी प्रति लाभार्थी 5 हेक्टर मर्यादेपर्यंत लाभ देय राहील. एकदा लाभ घेतलेल्या लाभधारकास पुन्हा 7 वर्षे सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येणार नाही. संचाचे आयुर्मान संपण्यापूर्वी लाभधारकाने संचाची विक्री केल्यास लाभधारकाचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्याला भविष्यात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, असे  विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment