Sunday 2 July 2017

पत्रकार मेळावा

समाजाच्या विकासात ध्येयवादी पत्रकारांचे उल्लेखनीय योगदान
-डॉ.सुभाष भामरे

नाशिक दि.2 –माहिती तंत्रज्ञान युगातही मुद्रीत माध्यमांनी आपले स्थान टिकविले असून सामाजिक विकास प्रक्रीयेत ध्येयवादी पत्रकारांचे उल्लेखनीय योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
परशुराम साईखेडकर सभागृहात बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित पत्रकार मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, संपादक डॉ.उदय निरगुडकर, माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, संपादक किरण अग्रवाल, भारतीय पत्रकार संघाचे विक्रम सेन,  बाळशास्त्री जांभोकर पत्रकार संघाचे महेंद्र देशपांडे, रविंद्र घोडविंदे, नरेंद्र पाटील, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

डॉ.भामरे म्हणालेसोशल आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडिया झपाट्याने वाढत असतानाही मुद्रीत माध्यमांवरचा जनतेचा विश्वास कायम आहे. समाजाचे प्रतिबिंब माध्यमातून प्रदर्शित होत असते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांचा इतर तीन स्तंभावर वचक असणे  गरजेचे आहे. नैतिकतेचा वचक हा सर्वोत्तम असतो. पत्रकारितेचे पावित्र्य जपून अशी नैतिकता जोपासण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
जनता आणि सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान यांना जोडणारा सेतू म्हणून माध्यमांनी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना सीमेवरील घटनांचे वृत्तांकन संवेदनशीलतेने होणे आवश्यक आहे, असे मतही डॉ.भामरे यांनी व्यक्त केले.
देशातील वेगाने विकसीत होणाऱ्या शहरात नाशिकचा समावेश असल्याचे नमूद करून ते म्हणाले, ‘मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात पाच डिफेन्स क्लस्टर उभारण्याबाबत राज्य शासनाशी चर्चा सुरू आहे. त्यातील एक क्लस्टर नाशिक येथे होणार आहे. जगातील सर्वोत्तम उत्पादकांकडून भारतीय तज्ज्ञांना प्रशिक्षण देवून देशातच संरक्षण साधनांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन तयार करून त्याची निर्यात करणे त्यामुळे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.निरगुडकर म्हणाले,‍ विश्वासार्हता हा पत्रकारितेचा आत्मा आहे. समाजमाध्यमे वेगाने विस्तारत असताना पत्रकारिता क्षेत्राची विश्वासार्हता टिकविणे अत्यंत महत्वाचे आहे. पत्रकारितेची मुल्ये आणि व्यावसायिकता यांची उत्तम सांगड घालणारी माध्यमे या विस्तारणाऱ्या प्रवाहात टिकून राहतील. माध्यमे वाढत असताना त्यांचे महत्व आणि समाजातील स्थान त्या प्रमाणात वाढते का याचाही विचार करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

श्री.भुजबळ यांनी पत्रकारांसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. पत्रकार कल्याण निधी, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आदींच्या माध्यमातून पत्रकारांना सुविधा देण्यात येत आहेलोकशाहीच्या या स्तंभाने अधिक सक्षमतेने काम करावे यासाठी शासनाचे संपुर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याला पत्रकाराची देदीप्यमान परंपरा असल्याचे ते म्हणाले.
 यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. माहिती संचालक भुजबळ यांनापत्रकार वैभवपुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.निरगुडकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

-----

No comments:

Post a Comment