Tuesday 4 July 2017

वृक्ष लागवड ओझर

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी व्हा
                                                                               -सुधीर मुनगंटीवार


नाशिक, दि. 4 : मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन महत्वाचे असून पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ओझर टाऊनशिप येथे एचएएल आणि वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, वनविभागाचे सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, उपायुक्त बाबासाहेब राजुरकर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती मनीषा पवार, लक्ष्मण सावजी, दादा जाधव आदी उपस्थित होते.

 श्री.मुनगंटीवार म्हणाले, येत्या 7 जुलैपर्यंत 4 कोटी वृक्षलागवड करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी 5 कोटी रोपांची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2 कोटी 44 लक्ष रोपांची लागवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली असून 20 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असतांना 7 जुलै पर्यंत 44 लक्ष रोपे जिल्ह्यात लावली जाणार आहेत. वसुंधरेचे ऋण फेडण्याचा हा छोटासा प्रयत्न असून पर्यावरण रक्षणासाठी त्याचे लोक चळवळीत रुपांतर होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ‘स्मार्ट सिटी’ सोबत ‘स्मार्ट पर्यावरण’ आणि ‘क्लिन सिटी’ सोबत ‘ग्रीन सिटी ’ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 वनमंत्री म्हणाले, वनविभागाने राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी स्थलसेने सोबत करार केला असून ‘इको बटालियन च्या माध्यमातून शास्त्रशुद्ध पद्धतीने वृक्षलागवड करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात औरंगाबाद येथे करण्यात आली आहे. राज्यातील  विविध रोपवाटिकांमध्ये 16 कोटी रोपे उपलब्ध असून राज्यात यावर्षी 4 कोटी आणि पुढील वर्षी 13 कोटी वृक्षलागवड होणार आहे. वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याची भावना रुजविण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सहभागी करुन घेण्यासाठी हरित सेनेच्या माध्यमातून एक कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी हरित सेनेचे सदस्य होऊन पर्यावरण रक्षणाच्या या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अवैध वृक्षतोडी  विरोधात ‘हॅलो फॉरेस्ट’ 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.

 श्री.खारगे म्हणाले, पर्यावरण संतुलनासाठी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे असून राज्यात 20 टक्के क्षेत्रावर  वन आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. वृक्षलागवड आणि संवर्धन आपल्या संस्कृतीचा एक भाग व्हावा आणि वृक्ष संवर्धनाची राज्यात चळवळ उभी रहावी यासाठी वन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.मुनगंटीवार यांचे हस्ते वृक्षसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात आपलं पर्यावरण ग्रुप, ‘गीव्ह/अंकुर’ संस्था, नेचर क्लब ऑफ इंडिया, नेचर कन्झर्व्हेशन, ग्रीन रिव्हॉल्युशन, नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, इको इको फाऊंडेशन, शरण फॉर ॲनिमल, अनिल माळी, नारायण भुरे, दत्ता उगांवकर, अनिरुद्ध जाधव, अमित खरे यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजितसिंघ यांच्यासह मान्यवरांचे हस्ते ओझर टाऊनशिप परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

----

No comments:

Post a Comment