Saturday 1 July 2017

दहिदी येथे वृक्ष लागवड

दहिदी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न
लोकसहभागामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाला गती - दादाजी भुसे

नाशिक,दि. 1: शासनातर्फे राबवण्यिात येणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमाला लोकसहभागामुळे गती प्राप्त झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी या उपक्रमाचे रुपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच मालेगाव  तालुक्यातील दहिदी या गावात शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय वनअधिकारी जे.एन.येडलावार, पं..सभापती प्रतिभा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्रात 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात राष्ट्रीय उत्सव असल्याप्रमाणे आनंददायी वातावरणात झाली. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचे आहे. वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे संगोपन करणे काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येकाने या उपक्रमाकडे भविष्याच्या दृष्टीकोनातून पहायला हवे, असे त्यांनी सांगितले.
श्री. स्वामी यांनी वृक्षाचे महत्व सांगून पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण निर्माण करणे गरजचे असल्याचे सांगितले. केवळ शासनाचा कार्यक्रम म्हणून या उपक्रमाकडे न पाहता प्रत्येक व्यक्तीने यात सहभाग घ्यावा आणि एक व्यक्ती एक झाड संकल्पनेनुसार अधिकाधीक झाडे जगवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.येडलावार यांनी गतवर्षी मालेगाव उप वनविभागात 7 लाख 33 हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून यावर्षी 9 लाख 56 हजार रोपे लावण्यात येणार असल्याची माहिती दिली. गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांपैकी 80 टक्के रोपे सुस्थितीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
दहिदी येथे 33 हजार रोपे लावण्यात येणार असून कार्यक्रमाला  वन विभागाचे अधिकारी  कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment