Thursday 13 July 2017

‍जिल्हा परिषद आढावा बैठक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम- दादाजी भुसे


नाशिक, दि. 13:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम होत असून जिल्ह्यातील कळवण, देवळा व नाशिक हे तीन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
‍जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, आमदार राजाभाऊ वाजे, नरहरी झिरवाळ, योगेश घोलप, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपायुक्त सुखदेव बनकर,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले असून त्यानुसार जिल्ह्यातील उर्वरीत 560 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मार्च 2018 अखेर पूर्ण करावयाचे आहे, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

 ते म्हणाले, गरीब बेघर कुटुंबाना आवास योजनांमधून घरकुल उपलब्ध व्हावेत यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी निधी देण्याची तरतूद असून त्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना करुन द्यावा. घरकुलांसाठी 783 लाभार्थ्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगून श्री.भुसे म्हणाले, शाळाची दुरुस्ती, रंगरंगोटी, कुंपण याबरोबरच ई-लर्निंग  सुविधा असणाऱ्या डिजीटल शाळा करण्यात याव्यात. शिक्षण विभागाने मालेगाव तालुक्यातील शिक्षकांच्या सहाय्यानेपेपरलेस मुख्याध्यापकही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी तयार केलेले संकेतस्थळ हा अभिनव प्रयोग राज्यातील इतर शाळातदेखील लागू करण्यात येईल. शाळा डिजीटल होण्यासाठी सीएसआर निधी, शासकीय अनुदान व खाजगी दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेतले जावे, असे ते म्हणाले.

यावेळी ग्रामीण रस्ते विकास, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, फलोत्पादन, रोहयो, लघु पाटबंधारे, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, अपारंपरिक उर्जा आदी विभागांच्या विविध योजनांची माहिती सादर करण्यात आली. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रउपक्रमांतर्गत मालेगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचे मंत्री महोदयांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी पी.टी. सोनवणे, महेश पाटील, पुरुष नसबंदीचे  उद्दीष्ट गाठण्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावर गौरव झाल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदींचा श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                                                         

                                              0000000

No comments:

Post a Comment