Thursday 13 July 2017

एनएमआरडीए कार्यालय उद्घाटन

नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन


नाशिक, दि. 13 : विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीत सुरू करण्यात आलेल्या महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाचे कामकाज आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.
यावेळी उपआयुक्त प्रकाश वाघमोडे, सहआयुक्त उन्मेश महाजन नगररचना विभागाच्या सहायक संचालक जयश्री सुर्वे तसेच क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त तसेच प्राधिकरणाचे महानगर आयुक्त महेश झगडे यांनी कार्यक्रमानंतर अधिकारी आणि क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा योग्य, शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाची स्थापना 1 मार्च 2017 रोजी करण्यात आली आहे. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळून नाशिक तालुक्यातील ग्रामीण भाग, दिंडोरी , निफाड, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भाग मिळून तयार झालेले आहे.

----

No comments:

Post a Comment