Thursday 6 July 2017

नामपूर पेयजल योजना

नामपूर पेयजल योजनेसाठी 16 कोटी मंजूर
नाशिक, दि. 6 : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने सटाणा तालुक्यातील नामपूर गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत 16 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नामपूर गावात सटाणा, ताहराबाद, मालेगाव, साक्री गावातील शेतकरी कामानिमित्त येतात. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काही शेतकरी बांधव नामपूर येथे स्थायिक झाल्याने गावाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढत असताना गावाला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
डॉ.भामरे यांनी प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर आणि पालकमंत्री  गिरीष महाजन यांच्या सहकार्याने नामपूरसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 2017-18 च्या आराखड्यात 16 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
हरणबारी ते नामपूर अशा 36 किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे 2.5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. चार लाख लिटर आणि तीन  लाख लिटरच्या अशा दोन टाक्या उभारण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ 20 हजार लोकसंख्येला होणार असून वाढीव भागातील वितरण व्यवस्थेचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. येत्या एक-दीड वर्षात योजना पुर्ण होऊन जनतेचा पाणी आणि आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होणार आहे. 

----

No comments:

Post a Comment