Wednesday 31 May 2017

नाशिक जिल्ह्याचा गौरव

‘लाख’मोलाची कामगिरी

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झालेल्या ‘दरवाजा बंद माध्यम अभियाना'च्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल  नाशिक जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
 या सोहळ्याला केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, राज्याचे पाणीपुरवठा सचिव राजेशकुमार आदी उपस्थित होते.
'स्वच्छ भारत' अभियानात जिल्ह्याने भरीव कामगिरी केली  आहे. ग्रामीण भागात एकूण 3 लाख 36 हजार 998 शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट असून आतापर्यंत एक लाख 76 हजार 937  शौचालय बांधण्यात आली आहेत.  एकूण 1368 पैकी 808 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यापैकी 508 ग्रामपंचायती याच वर्षात हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
वर्षभरात जिल्ह्यात एक लाख 4 हजार 319 शौचालये बांधण्यात आलीत.  2016-17 या वर्षात सर्वाधिक शौचालय बांधण्यात पुण्यानंतर नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. जिल्ह्यातील देवळा, कळवण आणि नाशिक हे तीन तालुकेदेखील हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
शौचालय बांधकामाचे सुक्ष्म नियोजन, प्रभावी संनियंत्रण, ग्रामस्थांशी थेट संवाद,  लोकसहभाग आणि अभियानातील सांघिक भावना ही या यशामागची मुख्य कारणे आहेत. सुक्ष्म नियोजनांतर्गत प्रत्येक आठवड्यात आढावा बैठक घेण्याबरोबरच सोशल मिडियाचा दैनंदिन कामकाजात प्रभावी वापर करण्यात आला. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर  आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मॉर्निंग पथक, टमरेल मुक्त गाव अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
 टमरेल मुक्त गाव अभियान विशेष प्रभावी ठरले. या अभियानांतर्गत पहाटेच्यावेळी गावात फिरून बाहेर टांगलेले टमरेल तसेच बाहेर शौचालयास जाणाऱ्या ग्रामस्थांचे टमरेल जप्त करण्यात आले. या टमरेलांची गावातून फेरी काढण्यात येऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचे आवाहन करण्यात आले. ही बाब ग्रामस्थांना शरमेची वाटू लागल्याने चांगली जनजागृती होण्यास मदत मिळाली.
कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयोजित गवंडी प्रशिक्षणामुळे गावात रोजगारही उपलब्ध झाला. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता चळवळीला गती देण्यात आली. स्वत: अधिकारी-कर्मचारी श्रमदानात सहभागी झाले. अनेक ठिकाणी महिलांनी पुढाकार घेऊन गाव हागणदारीमुक्त केले.
जिल्ह्याची वाटचाल आता संपुर्ण हागणदारीमुक्तीकडे सुरू आहे. उर्वरीत 560 ग्रामपंचायतीतील एक लाख 55 हजार 915 शौचालय बांधण्यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. प्रत्येक महिन्यात किमान दोन तालुके हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणर आहे. फेब्रुवारी 2018 अखरे संपुर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला. सामुहिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याचा हा गौरव जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. 'स्वच्छ भारत ' अभियानातील जिल्ह्याची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. यात सातत्य ठेवीत हागणदारीमुक्तीचे उद्दीष्ट नागरिकांच्या सहकार्याने निश्चितपणे पुर्ण केले जाईल यात शंका नाही.

-----

No comments:

Post a Comment