Sunday 28 May 2017

स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव

स्वा.सावरकरांना अभिप्रेत समाजविचार जपण्याचा प्रयत्न करु या
-        देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.28- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीभेद, विषमता याबरोरच समाजातील  अनिष्ट रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजातील या विषमता दूर करुन स्वा.सावरकरांना अभिप्रेत असलेला समाजविचार जपण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

        स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे जन्मगाव भगूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समितीचे निमंत्रक प्रसाद लाड, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमोल एडके, भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावरकरांनी आपले जीवन मातृभूमीला अर्पण केले. ते क्रांतीकारकांचे  प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य केले. अनेकदा अपमान आणि अन्याय सहन करून ही देशसेवेचा विचार सावरकरांनी कधीच ढळू दिला नाही. हे त्यांच्या जीवनातील मोठेपण होते.
अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी सावरकर सतत कार्यरत राहिले. इंग्रजांनी क्रांतीकारकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेकदा त्यांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी परिस्थितीला शरण न जाता तरुण पिढीत देशभक्तीचे स्फुल्लींग चेतविले. त्यांच्या तेजाने क्रांतीकारकांची वसाहत निर्माण करण्याचे कार्य केले. अंदमानच्या कारागृहातही त्यांनी कैदांना एकत्र करुन देशभक्तीचे धडे दिले. देशात जोपर्यंत जातीव्यवस्था, रुढी व परंपरा आहे. तोपर्यंत भारत गुलाम राहील हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी  या परंपरा तोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन  त्यांना अभिप्रेत असलेले विचार अनुसरण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, असे श्री.फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरदेखील सावरकरांच्या महान कार्याची दखल पाहिजे तशी घेतली गेली नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. महाजन म्हणाले, स्वा. सावरकरांनी त्याग, देशप्रेम आणि सहनशीलतेची शिकवण दिली. त्यांचा जीवनलेख सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. सावरकारांसारखे राष्ट्रप्रेमी भगूरच्या मातीतून घडले याचा जिल्हावासियांना अभिमान आहे. त्याग आणि सहनशीलतेची शिकवण देण्याऱ्या सावरकरांच्या स्मारकाचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच 65 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

स्मारकस्थळी अभिप्राय नोंदवहीत त्यांनी अभिप्राय नोंदविला. तेजस्वीता, तपस्वीता आणि त्यागाचे मुर्तीमंत उदाहरण असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर लक्षावधी क्रांतीकारकांचे प्रेरणास्त्रोत होते. बारा वर्षापेक्षा अधीक काळ अंदमानच्या शिक्षेची तमा न बाळगता प्रखर तेजाने इंग्रजी साम्राज्याविरोधातील मशाल तेवत ठेवणारे देशभक्त, कवी, समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या भारतमातेच्या तेजस्वी सुपुत्राच्या घराचे दर्शन मंदिराच्या दर्शनापेक्षा जास्त पवित्र आहेअसे श्री. फडणवीस यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत दुर्मिळ पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘संस्कार भारतीने काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची त्यांनी पाहणी केली. नंदेश उमप यांनी सादर केलेल्याशतजन्म शोधीतांनाया स्वा. सावरकर यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचादेखील त्यांनी आस्वाद घेतला. श्री.लाड यांनी जन्मोत्सव समितीच्यावतीने मुख्यमंत्री महोदयांना स्वा.सावरकर यांचे समग्र साहित्याचा संच भेट दिला. भगूरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर येथे स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा दौऱ्यावर ओझर विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर होते.
पालकमंत्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडेविशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
------


No comments:

Post a Comment