Sunday 28 May 2017

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतक महोत्सव

शाश्वत विकासासाठी ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज-   देवेंद्र फडणवीस             


नाशिक दि.28 –शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या भेदभावाला बाजूला सारणाऱ्या ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज आहे, , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक शिक्षण  प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या धामणकर सभागृहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, विनायक गोविलकर, देणगीदार गंगूताई धामणकर आणि सिंधूताई धामणकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकामध्ये पैसा नव्हे तर गुणवत्ता ही संपत्ती ठरेल. शिक्षणात सर्वसमावेशकता आहे. समाज घडवणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळेच शिक्षणाला गुणवत्तेकडे नेण्याची गरज असून हे काम शासन, शिक्षण संस्था, शिक्षक आणि पालकांचे आहे.
शिक्षणाबाबत पूर्वी राज्याचा देशात पंधरावा क्रमांक होता, पण सरकारने प्रगत शिक्षण अभियानाची अंमलबजावणी केली. 40 हजार शाळा उन्नत केल्या. याद्वारे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज ही गरज असून येथून पुढे भव्यतेपेक्षा आवश्यकता, नीटनेटकेपणा यांना महत्वाचे ठरणार आहे. ‘मोबाईल फोन’ हा या बदलाचा निदर्शक असून आपल्या हातामध्ये आपले ऑफिस, बँक, स्टोअर सामावले गेले आहे.  तंत्रज्ञानाचा अशा उपयोगामुळे विकासाचा मार्ग अधिक विस्तारणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 44 हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत, तंत्रज्ञानाचे दूत होण्याची घोषणा केली आहे ही महत्वाची घटना आहे. ज्ञानाची सर्वांसाठी दारे उघडी होण्यासाठी ज्ञान-युगात तंत्रज्ञानाचे योगदान आहे. या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक संस्थांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीतील आव्हाने पेलताना शिक्षणाच्या या वटवृक्षाखाली अनेक विद्यार्थ्यांनी ज्ञान घेतले आहे, अभिमान वाटावा असे असंख्य नामवंत विद्यार्थी निर्माण झाले आहेत. हे गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा चांगले काम झाले आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 100 वर्षे पूर्ण करणारी ही संस्था इतर शिक्षण संस्थांच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावेल. शतक महोत्सवी वर्षांत संस्थेने ज्ञान, विचार व संकल्पनांची देवाण घेवाण करणारे संमेलन आयोजित करुन चांगले कार्य हाती घेतले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या 1 कोटी सुर्य नमस्कारांचा उपक्रम हा ‘प्रिव्हेंटीव्ह मेडीसीन’चा उत्तम मार्ग आहे.  सुर्याच्या उर्जेचा हा स्त्रोत तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
समाजव्यवस्थेच्या संवर्धनामध्ये विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींनी आपण समाजाला काय देऊ शकतो हे विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाला एक कोटी रुपये दान करुन धामणकर भगिनींनी दातृत्वाचे मोठे उदाहरण उभे केले आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले .

पालकमंत्री महाजन म्हणाले, नाशिक हे विविध शिक्षणाचे हब असून येथे अनेक चांगल्या संस्था आहेत. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विद्यार्थीं  घडवले यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढतो आहे. ही संस्था अनेकांच्या ध्येय व त्यागातून उभी राहीली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणगीदार धामणकर भगिनींचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीची त्यांनी पाहणी केली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. काकतकर आणि कार्याध्यक्ष दाभक यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याची व उपक्रमांची माहिती दिली. कुसुमाग्रज, दत्ता भट, डॉ गिरीष ओक, शरद जोशी यासारख्या असंख्य नामवंतांनी संस्थेमध्ये शिक्षण घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
000000

No comments:

Post a Comment