Friday 5 May 2017

‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’

लोकसहभागातून ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविणार

       नाशिक, दि. 5 – जिल्ह्यात पाणी टंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून  ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ योजना राबविण्यात येणार असून या उपक्रमाद्वारे सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उद्योग, कंपन्या, सामाजिक संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचे समवेत झालेल्या बैठक प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी टी.के.जगताप, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, वासंती माळी, महेश पाटील, युवा मित्र संस्थेचे नितीन आढांगळे, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे विजय हाके, निमाचे संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी म्हणाले, सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढून  पाणी साठवण क्षमता वाढवल्याने पाणी टंचाई दूर करता येईल. राज्य शासनाने याबाबत नुकताच निर्णय घेतला असून यासाठी उद्योग, शासन आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम केल्यास योजना अधिक चांगल्या प्रकारे राबविणे शक्य होईल. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षी देखील जिल्ह्यात कंपन्यांच्या सहकार्याने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून  मोठे काम झाले आहे. याचा चांगला फायदा ग्रामीण भागाला होत आहे.
राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यातील 2 हजार 194 पाझर तलाव, 1 हजार 500 गाव तलाव व सात हजार  सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्याची गरज आहे. याद्वारे निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार असून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. यासाठी लागणारी जेसीबी, पोकलॅन आदी यंत्रणा उद्योजकांनी उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी लागणारा इंधन खर्च शासन करणार आहे. या यंत्राचा खर्च उद्योजकांच्या सहभागातून झाल्यास  जलसंधारणाचे मोठे काम शक्य होणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी मागील वर्षी महिंद्रा कंपनीने इगतपुरी मधील अवनखेड व अवली, बॉश कंपनीने पहिने, हिरणवाडी येथे आणि युवा मित्र संस्थेने सिन्नर-वावी,आर्ट ऑफ लिव्हिंगने सटाणा-देवळा भागात केलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. पावसाळा सुरु होण्यास सहा आठवडे असल्याने प्रशासकिय यंत्रणेने तातडीने नियोजन करुन 15 मे पूर्वी 200 ठिकाणी कामे सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 बैठकीस महिंद्रा, ग्लास्को, बॉश, जिंदाल, रतन इंडिया, पॉवर ग्रीड, आयमा आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****************


No comments:

Post a Comment