Saturday 13 May 2017

जलयुक्त शिवार आढावा बैठक

‘जलयुक्त’ची कामे 30 जूनपर्यंत पुर्ण करा- प्रा. राम शिंदे

नाशिक दि.13- जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्याला समाधान देणारी योजना ठरली असून 2016-17 ची कामे 30 जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश  राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार अनिल कदम, डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, नरहरी झिरवाळ, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे,  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, कृषी सहसंचालक कैलास मोते,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.
श्री.शिंदे म्हणाले, या योजनेला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. गाळ वाहून नेण्यासाठीही लोकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. या अभियानातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन अधिकाऱ्यांनी करावे. चालू वर्षातील कामांचे प्रकल्प अहवाल त्वरीत तयार करून त्यास मंजूरी देण्यात यावी. तसेच पावसाळ्यापूर्वी अधिकाधीक कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. कामे वेळेवर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियानाद्वारे जिल्ह्यातील कमी पर्जन्याच्या भागात  शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. यात सातत्य ठेवून अधिकाधीक लोकसहभागातून कामे करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
  योजनेतील लोकसहभाग वाढवून चांगले काम अधिक पाणीसाठा होईल अशी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश श्री.डवले यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी  जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांचा आढावा सादर केला.
 जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 या वर्षात जिल्ह्यात एकुण 229 गावांची निवड करण्यात आली होती. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण 8108 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रत्यक्षात एकुण 8110 कामे म्हणजेच शंभर टक्के कामे पुर्ण झाली असून त्यासाठी एकुण रक्कम 181 कोटी 25 लाख खर्च करण्यात आला.
 तसेच 2016-17 या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियांनांतर्गत एकुण 218 गावांची निवड करण्यात आलेली आहे. सदर गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकुण रक्कम रुपये 194 कोटी 95 लाखाची एकुण 6069 कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यापैकी एकुण 4657 कामे सुरु झालेली असून त्यापैकी 3618 कामे पुर्ण झालेली आहेत व 1039 कामे प्रगतीपथावर आहेत. सदर कामावर एकूण रुपये 93 कोटी 89 लाख 21 हजार इतका खर्च झालेला आहे.
सन 2015-16 मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेअंतर्गत शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून 591 कामे करण्यात आली असून 36 लाख 26 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर 2016-17 या वर्षात 323 कामातून 8 लाख 81 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
जिल्ह्यात मे 2016 मध्ये  194 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर यावर्षी 45 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या जल व मृद संधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सरासरी 1.5 ते 2 मीटरने वाढ झाली आहे. अभियानाच्या माध्यमातून 2015-16 मध्ये 41 हजार 803 टीसीएम पाणीसाठा निर्माण झालेला असून  एकूण 74 हजार 576 हेक्टर एक पाळी संरक्षीत सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.
अभियानाद्वारे समाविष्ट बहुतांश गावात पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असून जिल्ह्याची टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2017-18 साठी अभियानांतर्गत 200 गावांची निवड करण्यात आली असून ग्रामसभेच्या मान्यतेने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
०००००





No comments:

Post a Comment