Friday 26 May 2017

शेततळ्यामुळे फळबाग बहरली

शेततळ्यामुळे दातली गावच्या शेळके यांची फळबाग बहरली

नाशिक दि.26- उन्हाळ्यात टंचाईचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातल दातली गावात शरद शेळके या सुशिक्षित शेतकऱ्याने शेततळ्याच्या सहाय्याने टंचाईवर मात करून फळबाग लागवड केली आहे. शाश्वत सिंचनसुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी डाळींबाची लागवड करून उत्पन्न वाढविले आहे.
शेळके यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यात खरीपाबरोबर भाजीपाला पिकविला जात असे. अनेकदा पाणी टंचाईमुळे उत्पन्न कमी झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागे. शेतातली विहिर नोव्हेंबरमध्ये अटत असल्याने दुसऱ्या पिकासाठी तीचा उपयोग मर्यादीतच होता. त्यामुळे विहिरीच्या पाण्यावर अर्ध्या एकर क्षेत्रात लावलेली डाळींबाच्या बागेद्वारे त्यांना काहीच लाभ झाला नाही. डाळींबाला पाणी देण्यासाठी टँकरचा खर्च करावा लागत असल्याने खर्च वाढून उत्पन्न कमी मिळत होते.

कृषी सहाय्यक रुपाली लावरे यांच्याकडूनमागेल त्याला शेततळेया योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी डाळींबाच्या बागेसाठी शेततळे घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्याचबरोबर शेततळ्याला लागणारा खोदकाम खर्च आणि कुंपण असे मिळून त्यांना 50 हजाराचे अनुदान मिळाले. फेब्रुवारी 2016 महिन्यात शेततळे तयार झाले.
पावसाळ्यात विहिरीच्या पाण्यातून शेततळे भरल्यानंतर त्यांनी डाळींबाच्या बागेचे क्षेत्र साडेतीन एकरावर नेले आहे. सोबतच भाजीपाला लागवडही अधिक प्रमाणात केली आहे. शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाल्याने त्यांनी शेतात ठिबक सिंचनाची सुविधा केली आहे. त्यासाठीदेखील कृषी विभागाकडून अनुदान मिळालेत्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.
शेळके यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळपिकांसाठी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टरसाठी एक लाखचे अनुदान घेतले. त्यामुळे शेतातील कामांनादेखील गती येण्याबरोबरच मजूरांची कमतरतादेखील भासत नाही.
शाश्वत सिंचन आणि यांत्रिकीकरणामुळे उत्पनात वाढ  झाल्याचे शेळके सांगतात. पूर्वी वर्षाला 1 लाख असणारे उत्पन्न आता 3 लाखावर पोहोचले आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेळके यांची वाटचाल आर्थिक समृद्धीच्या दिशेने सुरू आहे.

शरद शेळके- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याने जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. जुने कौलारू घर पाडून नवे घर उभारण्याचा विचार आहे. शेततळ्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने हा सर्व बदल शक्य झाला. नवे तंत्रज्ञान शेतीसाठी खरोखर उपयुक्त आहे.


No comments:

Post a Comment