Sunday 14 May 2017

होमिओपॅथी कार्यशाळा

सकारात्मक दृष्टीकोनातून होमिओपॅथीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न
                                                                                       -विष्णू सवरा

नाशिक, दि.14- होमिओपॅथीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सेवा होत असून होपिओपॅथीच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येईल आणि त्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचेशी चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी दिली.
          ब्रह्मा रिसॉर्ट येथे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती आणि फेडरेशनतर्फे आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ.हेमंत सरवारे, डॉ.स्वप्नील महाजन, डॉ. निलेश जाधव, डॉ.प्रकाश राणे आदी उपस्थित होते.
          श्री.सवरा म्हणाले, होमिओपॅथीचा अधिकाधीक जनतेला कसा  लाभ होईल याचा निश्चितपणे विचार करण्यात येईल. राज्यात होमिओपॅथीच्या जागा वाढविण्याबाबतही संबंधीत मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. केंद्र शासनाशी संबंधीत विविध मुद्यांबाबत राज्य शासनातर्फे शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
          राज्य शासनाने सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पं.दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानसारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत. इंट्रीग्रटेड मेडीकल हब सुरू करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला असून त्यात 50 जागा होमिओपॅथीसाठी आहेत. होमिओपॅथीचे चांगले प्रशिक्षण अधिकाधीक डॉक्टरांना मिळायला हवे अशी शासनाची भूमीका असल्याचे ते म्हणाले. नुकतेच नाशिक येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत 21 हजार 700 शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णसेवेत शासनाच्या प्रयत्नांना वैद्यकिय क्षेत्रातून साथ मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

०००००

No comments:

Post a Comment