Saturday 13 May 2017

पर्यटन चर्चासत्र

पर्यटनाचे मुख्यद्वार म्हणुन इगतपुरीचा विकास करणार
                                               -जयकुमार रावल

   नाशिक दि.13- जिल्ह्यात पर्यटनाचा विकास करण्यासाठी पर्यटनाचे मुख्यद्वार म्हणुन इगतपुरीचा विकास  करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
           हॉटेल ताज गेट वे येथे ट्रॅव्हल एजेट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) , ऑल इंडिया वायनरी असोसिएशन व इगतपुरी हॉटेल असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव, उपाध्यक्ष राजेंद्र बकरे, कार्याध्यक्ष सागर वाघचौरे, सुला वाईन्सचे नीरज अग्रवाल, ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर विनोद पांडे आदी उपस्थित होते.

        श्री.रावल म्हणाले, पर्यटनाच्यादृष्टीने इगतपुरीचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार आहे. इगतपुरी येथे वेलनेस सेंटर, भावली धरण येथे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विविध सोयी सुविधा करण्यावर भर देण्यात येणार आहे. फ्लॉवर फेस्टीवल, सुला फेस्टीवल, सांस्कृतिक मेळा, निसर्गमेळा आदी बारमाही सोहळे आयोजित करण्यासाठी ‘तान’ने पुढे यावे. शासनातर्फे यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल , अशी ग्वाही त्यांनी दिली.
   मुंबईतील पर्यटकांना नाशिककडे आकर्षित करण्यासाठी संस्थेने मुंबई येथे प्रतिनिधी नेमावा. नाशिकमधील विविध पर्यटनस्थळांची माहिती त्यामाध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. त्र्यंबकेश्वर-शिर्डी-मुंबई पर्यटन सर्कीटचा विकास करून पर्यटकांना त्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. वाईन पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
   गोदाकाठी धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘गंगा आरती’ वर्षभर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी पुरोहित संघाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितली.
          यावेळी संस्थेच्या अध्यक्षांनी सादरीकरणाद्वारे इतर देशातील पर्यटन प्रकल्पांची आणि नाशिक पर्यटन विकासाच्या संधीविषयी माहिती दिली.

----

No comments:

Post a Comment