Monday 1 May 2017

स्वस्थ महाराष्ट्र अभियान शुभारंभ

स्वस्थ महाराष्ट्र अभियानाचा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शुभारंभ


नाशिक, दि. 1:-  राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत 1 ते 27 मे 2017 दरम्यान  राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेचा शुभारंभ  वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आला.
श्री.महाजन म्हणाले, एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अभियानांतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया आणि उपचार करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 जिल्ह्यातील गरीब आणि गरजू जनतेच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी नाशिक येथे नुकतेच ‘महाआरोग्य शिबिरा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून  मोफत शस्त्रक्रीया आणि उपचार करण्यात येत असल्याची माहितीदेखील पालकमंत्र्यांनी दिली.

            पं. दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत  नाशिक, पालघर, अकोला,  बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. आरोग्य पूर्व तपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येतील. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील एक असे सहा जिल्हे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.     
पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस  विषयांतील आजारांसंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून शासनस्तरावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समिती करणार आहे. या मोहिमेच्या आधारावरच राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र योजना राबविण्यात येणार आहे.

0000

No comments:

Post a Comment