Saturday 13 May 2017

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार

शाश्वत सिंचनासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारयोजना उपयुक्त
                                                                             -प्रा.राम शिंदे

नाशिक दि.13- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अनेक गावे टँकरमुक्त होत असताना शासनाने सुरू केलेली गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शाश्वत सिंचनासाठी उपयुक्त ठरेल आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
चांदवड तालुक्यातील डोंगरगाव येथे हिंदोळी धरणातील गाळ काढणे व राहुड पाटचारीची पाहणी करून विस्तारीकरण  करण्याच्या कामाचे उद्घाटन श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पंचायत समिती सभापती नितीन गांगुर्डे, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, आर्ट ऑफ लिव्हींगचे समन्वयक विजय हाके, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, कृषी सहसंचालक कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे आदी उपस्थित होते.      

श्री.शिंदे म्हणाले, धरणांमधील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठा वाढून शेताची सुपीकता वाढल्याने पीकांचे उत्पादनही वाढेल. नाशिक जिल्हा सुपीक असूनही काही भागात असणाऱ्या पाणीटंचाईवर या योजनेच्या माध्यमातून मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले परिणाम दिसून आल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्यात सुमारे दोनशे टँकर सुरु असताना ती संख्या 48 वर आली आहे. हे जलयुक्त शिवार अभिानाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवड तालुक्याने अभियान चांगल्या प्रकारे राबविल्याने तालुक्याला पुरस्कार मिळाल्याचे नमूद करून इतरही तालुक्यांनी याप्रकारे कामे केल्यास जिल्हा टँकरमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ.आहेर यांनी जिल्ह्यात लोकसहभागाच्या माध्यमातून अभियान चांगल्याप्रकारे राबविले जात असल्याचे सांगितले. अभियानांतर्गत अधिकाधीक कामे करून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यातील 22 गावात कामे हाती घेण्यात आली आहेत. पांझण नदीच्या 30 किलोमीटर क्षेत्रात रुंदीकरण आणि खोलीकरणाची कामे करण्यात येत असून उसवा, राहूड, डोंगरगाव या गावांना त्याचा लाभ होणार आहे. गाळ काढण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि लोकसहभागातून ही कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment