Thursday 5 April 2018

इनोव्हेशन डे समारोप


 समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी योगदान द्या - तुकाराम मुंढे


          नाशिक , 5-  योग्य दृष्टीकोनातून चांगल्या कल्पनांचा विकास करीत समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी युवा संशोधकांनी योगदान द्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
          नाशिक जिल्हा इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक इंजिनिअरींग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'इनोव्हेशन डे' उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा ऑटो काम्पोनन्टचे संचालक राम भोगले, नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरचे अध्यक्ष के.एस.पाटील, इएसडीएस सॉफ्टवेअरचे पीयुष सोमाणी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

          श्री.मुंढे म्हणाले, इनोव्हेशनच्या माध्यमातून नव्या शोधाची निर्मिती व्हायला हवी. इनोव्हेटरसाठी पैसा हे उद्दिष्ट न राहता सामान्यजनांच्या समस्या सोडविण्याऱ्या नव्या कल्पना उद्दिष्ट असायला हवे. अशा नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी शासन स्टार्ट अप आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. शहरी भागातल्या समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन करण्यासाठी महानगरपालिका सर्व प्रकारचे सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

          ते म्हणाले, खुले निरीक्षण आणि विचारांनी नव्या कल्पना जन्माला येतात. त्या कल्पनांपर्यंत मर्यादित न राहता नियोजनबद्ध प्रयत्नांच्या माध्यमातून मानवाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा विचार व्हायला हवा. अशा नव्या कल्पनांची निर्मिती अधिक प्रमाणात होण्याबरोबर उपयुक्ततेकडेही लक्ष द्यायला हवे. उपयुक्त तंत्रज्ञानाच्या मागचे वैज्ञानिक तत्व जाणून घेतल्यास त्याचा अधिक प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नवसंशोधकांनी शोध प्रक्रियेत निरंतरता ठेवावी, असे त्यांनी सांगितले. वाहन उद्योगात इनोव्हेशनला मोठी संधी असल्याचे श्री.मुंढे म्हणाले.

          श्री.भोगले म्हणाले, नवी कल्पना समस्यांवर मार्ग शोधून मानवी जीवन सोपे करते. अशी कल्पना उत्पादनापुरती मर्यादीत न रहाता जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी असावी. इनोव्हेशनमागचे विज्ञान समजावून घेतल्यास अशा कल्पनांना अधिक पुढे आणणे शकय आहे. निरीक्षणाने नव्या कल्पना जन्माला येतात. त्यामागचा सिद्धांत समजावून घेत अशा कल्पनांना उत्तम उत्पादनात परिवर्तीत करावे, असे त्यांनी सांगितले.

          इनोव्हेशन साठी शोधक वृत्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी मोकळेपणाने विचार करायला शिकावे. जीवनातील समोर येणाऱ्या मर्यादांना आव्हान देत नवनिर्मितीचे तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.  शासन इनोव्हेटर्सला विविध पातळ्यावंर सहकार्य करीत असून त्याचा लाभ नव्या संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
          श्री.जालानी यांनी कार्यसंस्कृती निर्माण करून आपल्यातील क्षमतांचा विकास करीत आव्हानांना सामोरे जा, असे सांगितले.
          मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
----

No comments:

Post a Comment