Friday 13 April 2018

झिरो पेंडन्सी कार्यशाळा


शून्य प्रलंबिततेसाठी निर्णय प्रक्रिया वेगाने राबवावी-राजाराम माने

       नाशिक दि. 13 : शून्य प्रलंबितता व दैनंदिन कामकाजाचा निपटारा विहित मुदतीत होण्यासाठी अधिकाऱ्यांनी निर्णय प्रक्रिया वेगाने राबवावी, तसेच कागदपत्रांचे जतन योग्य पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश  विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, अपर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.

          श्री. माने म्हणाले, नागरिकांची व प्रशासकीय कामे जलदगतीने होण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या कार्यपद्धतीचा अवलंब प्रत्येक विभागाने काटेकोरपणे करावा. कामकाज गतिमान करण्यासाठी संगणक प्रणालीचा वापर अधिक प्रमाणात करण्यात यावा. याअनुषंगाने कार्यालयीन अभिलेख्यांसोबतच संगणकीय माहितीचे व्यवस्थापन आणि जतन योग्यपद्धतीने करण्यात यावे. अधिक डेटा उपयोग करणाऱ्या विभागांनी त्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देशही विभागीय आयुक्त यांनी दिले.
          सदरची कार्यवाही हे एक अभियान किंवा मोहीम म्हणून न राबविता एक स्थायी स्वरूपाची व्यवस्था म्हणून कायमस्वरूपी राबविण्यात यावी. यासाठी कार्यालयात सामुहिकरित्या जबाबदारी पार पाडतांना विभाग प्रमुखांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असेही श्री. माने यांनी सांगितले.

          श्री. स्वामी म्हणाले, ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या कार्यपद्धतीच्या अमंलबजावणीमुळे कार्यक्षमता वाढून प्रशासकीय कामात पारदर्शकता व सुटसुटीतपणा येईल. याचसोबत जुन्या अभिलेख्यांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करण्यासाठी सहा गठ्ठे पद्धती, अभिलेख्याचे  वर्गीकरण व अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण याबाबींवर लक्ष देण्यात यावे. प्रत्येक प्रकरण विहित मुदतीत पूर्ण करून त्याचा अहवाल वेळेवर सादर करावा. याप्रक्रियेमुळे कार्यालयीन कामकाजात सोपेपणा येण्याबरोबर जनतेच्या समस्या वेळेत सुटणार असल्याने कार्यालय प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले.
प्रास्ताविकात श्री. गावडे यांनी शासन निर्णयाविषयी माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे विभागीय अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment