Wednesday 4 April 2018

50 कोटी वृक्ष लागवड


जिल्ह्यात 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादनाचा प्रयत्न करा-विकास खारगे


नाशिक, 4 :  शाश्वत विकासासाठी  हरित क्षेत्र वाढणे गरजेचे असून राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 33 टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम माने, सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एच.पाटील, अपर मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव महेष गुप्ता, मुख्य वनसंरक्षक टी.रामाराव, टी.एन. साळुंके, उपायुक्त अर्जुन चिखले आदी उपस्थित होते.
श्री.खारगे म्हणाले, वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. टंचाईची परिस्थिती दूर करण्यासाठी आणि नद्य पुर्नप्रवाहीत करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. केवळ उद्दीष्ट पुर्तता करण्याच्यादृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता पुढच्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी यात सहभाग घ्यावा. जंगलक्षेत्र केवळ 20 टक्के असल्याने जंगल विरहीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे आवहान त्यांनी केले.

ते म्हणाले, नद्यांचे पुनरुज्जीवर होण्यासाठी नदी किनारी दोन्ही बाजूस एक किलोमीटर अंतररावर झाडे लावावीत. शेतजमीनीवरवृक्षाधारीत शेतीकरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. वृक्ष लागवड कार्यक्रमाविषयी विश्वासार्हता वाढविण्यासाठी झाडे जगविण्याचे प्रमाण वाढवावे. जिल्हाधिकारी यांनी वृक्ष लागवड क्षेत्राला भेट देऊन पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या 2017 च्या अहवालात राज्यात जंगलक्षेत्र, मँग्रुव्हज, बांबू क्षेत्र आणि जंगलातील जलस्त्रोतात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण रक्षणासाठी हरितसेना उपक्रम राबविण्यात यत असून 45 लाख हरितसैनिकांची नोंदणी करण्यात आल्याचे श्री.खारगे म्हणाले. नागरिकांशी संपर्क वाढवून या उपक्रमाचे महत्व पटवून द्यावे, असे ते म्हणाले.
श्री.माने म्हणाले, नदी किनारी वृक्ष लागवड केल्याने जमिनीची जलधारण क्षमता वाढेल आणि या भागात अतिक्रमणही होणार नाही.  परिसरातील भूजल पातळी वाढण्यासदेखील मदत होऊन पावसाळ्यसानंतरही पाणी उपलब्ध होईल. त्याबरोबर धरणाला लागून असलेल्या गाळपेर जमिनीवरही वृक्षलागवड करण्यात यावी.
जलयुक्त शिवार योजनेची सांगड वृक्षलागवडीशी घालावी. वृक्ष लागवडीसाठी जागा निवडतांना आर्दता धारण करण्याच्या क्षमतेचाही विचार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षलागवड करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासन स्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये वृक्षसंवर्धन विषयाचा समावेश करावा, असेही श्री.माने म्हणाले.

यावेळी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी सादरीकरणाद्वारे यावर्षीच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यात हरितसेनेअंतर्गत एक लाख 97 हजार, नंदुरबार 39 हजार, धुळे 34 हजार, नाशिक 2  लाख 74 हजार आणि जळगाव जिल्ह्यात 79 हजार नोंदणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नंदुरबारसाठी 49 लाख, अहमदनगर 49 लाख 94 हजार, धुळे 43 लाख 39 हजार, नाशिक 72 लाख आणि जळगाव जिल्ह्यासाठी 42 लाख रोपांचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. विभागातील रोपवाटीकेत पुरेशा संख्येत रोपे उपलब्ध आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे लाख उत्पादनासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. उतरणे गावात जिल्हा परिषदेमार्फत लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जळगाव येथे त्रिपक्षीय कराराद्वारे मॅगसेसे पुरस्कार प्राप्त निलिमा मिश्रा यांच्या उपस्थितीत 10 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
बैठकीत नाशिक महानगरपालिकेने वृक्षसंवर्धन आणि वृक्षगणनेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. नाशिक महापालिकेचे उदाहरण इतर महापालिकांसमोर ठेवले जाईल, असे श्री.खारगे म्हणाले. नाशिक शहरातील वृक्षगणनेत 46 लाख 53 हजार 18 वृक्षांची गणना करण्यात आली असून 250 प्रजाती आढळल्या आहेत. त्यापैकी 70 प्रजाती दुर्मिळ आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
बैठकीस नाशिक विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, विविध यंत्रणांचे विभागीय अधिकारी उपस्थित होते.
-----

No comments:

Post a Comment