Wednesday 11 April 2018

इमारत उद्घाटन


शाळा-महाविद्यालयातून जीवनमूल्ये जोपासणारी पिढी घडवा
                                           - चंद्रकांत पाटील

नाशिक दि.11: शाळा-महाविद्यालयांमधून  जीवनमूल्ये जोपासणारी ज्ञानवान पिढी शिक्षकांनी घडवावी, असे आवाहन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
          सिन्नर तालुक्यातील मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उद्योजक  राधाकिसन चांडक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शतक महोत्सवी समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायकराव गोविलकर आदी उपस्थित होते.

          श्री. पाटील म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे आणि संस्कारांचे बीज रोवण्याचे काम शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांवर घडविले जाणारे संस्कार त्यांच्या यशस्वी जीवनाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे शाळेची इमारत सुंदर असण्यासोबतच त्यातून जीवनाचे मूल्य जोपासणारी पिढी घडविण्याचे कार्य होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवर नम्रता व मोठ्यांविषयी आदराचे संस्कार शाळेतून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला शिक्षीत बानविण्यासाठी जो पाया रचला त्यामुळे आज अनेक पिढ्यांना विकास साधणे शक्य झाले आहे.  आजच्या गतिशील व व्यवहारी जगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा आवश्यक आहे त्याप्रमाणेच खाजगी आयुष्यातील भावविश्व जपण्यासाठी मातृभाषा देखील महत्वाची आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

          श्री. गोविलकर म्हणाले, विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लावण्यासाठी  लहानपणापासूनच त्यांच्या कोमल व निरागस मनावर संस्कार करण्याचे काम शिक्षक करत असतात. प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यभरासाठी विद्यार्थ्याच्या भूमिकेत असते. आयुष्यातील प्रत्येक प्रसंग व परिस्थिती हे माणसाला शिकवण्याचे काम करीत असतात.
          कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री. पाटील यांच्या हस्ते विद्यालयाच्या नुतन इमारतीचे कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांनी नुतन वास्तूची पाहणी केली. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
000

No comments:

Post a Comment