Monday 23 April 2018

रस्ता सुरक्षा अभियान


रस्ता सुरक्षेबाबत जागृतीसाठी लोकसहभाग आवश्यक-राधाकृष्णन बी.

नाशिक, 23 : रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती घडवून अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक संजय दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपअधिक्षक विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे, शिक्षण विभागाचे  उपसंचालक एस.एस.गोविंद आदी उपस्थित होते.


श्री. राधाकृष्णन म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियान पंधरवडापुरते मर्यादीत न ठेवता त्यामध्ये सातत्य ठेवुन जनजागृतीसाठी नवनवीन उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिकांनीदेखील आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. सुरक्षा विषयक नियमांचे पालन प्रत्येक घटकाद्वारे झाल्यास वाहतुक सुरक्षेसाठी मोठी मदत होईल. नाशिकच्या स्मार्ट सिटीच्या दृष्टिने वाहतुक व्यवस्थापन करणे देखिल तितकेच गरजेचे आहे. अनावश्यक स्पिडब्रेकर काढणे गरजेचे असल्याचे सांगून  ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सुचना त्यांनी केली.


श्री. दराडे यांनी  शाळा-महाविद्यालयांना व स्वयंसेवी संस्थाना अशा अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.  रस्त्यावरून पायी अथवा वाहनाने जाणाऱ्या नागरिकाच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे व शिक्षण, तंत्र आणि अंमलबजावणी या त्रिसुत्रीचे पालन करावे,असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागात होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत मागील वर्षी 80 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानात शाळा-महाविद्यालयांचा मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेवून रस्ता सुरक्षेच्या नियमांकडे लक्ष दिले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी  नियमांचे पालन करुन चालविणारा वाहनचालक, रस्ते निर्माण करणारे अभियंते, नियमांची अंमलबजावणी आणि अपघात घडल्यानंतर कमी कमी कालावधीत मिळणारे उपचार या चार  घटकाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. कळसकर यांनी रस्ता अपघातांच्या कारणांचे विश्लेषण केले. रस्ता अपघात रोखणेसाठी सर्व संबंधीत घटकांची जबाबादारी असून नाशिक परिवहन विभागामार्फत जिल्हा रस्ता सुरक्षा अंतर्गत सर्वकष उपायोजना सातत्यपूर्ण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनचालकासाठी समुपदेशन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.आहिरे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल माहिती सांगितली.   यावेळी  सडक सुरक्षा, जीवन रक्षा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
---

No comments:

Post a Comment