Friday 6 April 2018

आरओ प्लॅन्ट उद्घाटन


सप्तश्रृंग गडासाठी 25 कोटीचा विकास आराखडा-दादाजी भुसे
नाशिक, 6 : महाराष्ट्र शासनाने सप्तश्रृंगी गडाला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र घोषित केले असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिकाधीक सुविधा देण्यासाठी लवकरच 25 कोटीचा विकास आराखडा शासनास सादर करण्यात येऊन त्यास तातडीने मंजूरी देण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

वणी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल ई-लर्निग क्लासरुम व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आर.ओ प्लॅन्टच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, सरपंच सुमनबाई सुर्यवंशी, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपसरपंच राजेश गवळी, गिरीष गवळी आदी उपस्थित होते.

 श्री. भुसे म्हणाले, वणी गावातील विकास चांगल्याप्रकारे होत आहे. इंग्लिश माध्यमाच्या स्पर्धेत जिल्हा परीषदेच्या शाळेतील विद्यार्थी टिकला पाहिजे या हेतूने वणी येथील जिल्हा परिषद शाळेत डिजीटल ई-लर्निंग क्लासरूम सुरू करण्यात आले आहे. शासनातर्फे राज्यातील हजार शाळांमध्ये अशी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे असा शासनाचा प्रयत्नआहे.   

वणी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र शुद्धीकरण प्रकल्प येत्या काळात उभारण्यात येईल. तसेच वनविभागाकडून अडीच एकर जागा उपलब्ध करुन व्यावसायिकांसाठी डोमची व्यवस्था आणि भाविकांसाठी उद्यानाची व्यवस्था करण्याचादेखील प्रयत्न नव्या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘निर्मल वारी’च्या संकल्पना गडावर राबविण्यात येऊन येथील स्वच्छता व पावित्र्य राखण्याचा प्रयत्न, सर्वांनी मिळून करावा,असे आवाहन त्यांनी केले.
श्री.भुसे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त निलेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वाटप करण्यात आले.
----

No comments:

Post a Comment