Monday 9 April 2018

उद्योग बैठक


एकात्मिक उद्योग क्षेत्रासाठी दहा हजार हेक्टर जमीन उपलब्ध होणार
                                                     -सुभाष देसाई

नाशिक दि.9- सेझसाठी निश्चित केलेल्या मात्र कार्यवाही न झालेल्या ठिकाणी एकात्मिक उद्योग क्षेत्र करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून यामुळे  राज्यातील सेझची दहा हजार हेक्टर जमीन उद्योग विकासासाठी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
          सिन्नर तालुका औद्योगिक वसाहत येथील उद्योग भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, नगराध्यक्ष  किरण डगळे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, रामदास दराडे, कमलाकर पोटे, नामकर्ण आवारे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.रेंदाळकर, अधिक्षक अभियंता नितीन वानखेडे आदी उपस्थित होते.

          श्री.देसाई म्हणाले, केंद्र शासनामार्फत एकात्मिक उद्योग क्षेत्राबाबत नियमावली तया करण्यात येत असून त्याचा लाभ औद्योगिक क्षेत्रासाठी होईल. तसेच यामुळे सेझबाबतचा तालुक्यातील प्रश्न सुटण्यास मदत होईल.  झोन बदलाबाबतच्या धोरणात शासनस्तरावर सुधारणा करण्यात येईल. औद्यागिक क्षेत्रातील कराबाबत ग्रामविकास विभागाशी चर्चा करण्यात आली असून या क्षेत्रातील करवसुली उद्योग विभागातर्फे करण्यात येईल व त्याचा  निम्मा हिस्सा ग्रामपंचायतीला देण्यात येईल. तसचे उर्वरीत रक्कम औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांसाठी  वापरली जाईल, असे त्यांनी सांगितले.
          श्री.देसाई यांनी मुसळगाव येथे औद्योगिक क्षेत्रात सहकाराच्या आधारे  यशस्वी संस्था सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सहाकरी उद्योग वसाहतीतील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासाठी इतर शासकीय विभागांशीदेखील चर्चा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

          उद्यांगमंत्र्यांनी उपस्थितांकडून औद्योगिक क्षेत्राच्या समस्या जाणून घेतल्या. औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभाग तातडीने निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
          मुसळगाव सहकारी उद्योग वसाहतीमध्ये शासनाच्यावतीने 2 कोटी 70 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्ते पायाभूत प्रकल्पाचे  उद्योगमंत्री यांच्या हस्ते भूमीपुजन  श्री.देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
-----

No comments:

Post a Comment