Wednesday 4 April 2018

इनोव्हेशन डे


राज्याचे इनोव्हेशन धोरण तयार करण्याची बाब विचाराधीन-असीम गुप्ता

         
       नाशिक, दि.4:- विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याकरिता राज्यासाठी इनोव्हेशन धोरण तयार करण्याचे विचाराधीन आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता आणि ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी केले.  
          नाशिक डिस्ट्रीक्ट इनोव्हेशन कौन्सिल व नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरच्यावतीने आयोजित इनोव्हेशन डेउपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
          श्री. गुप्ता म्हणाले, स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन उद्योजक पूढे येत आहेत. अनेकांना संधी मिळत आहे. पण स्टार्ट अप आणि इनोव्हेशन हे पूर्णत: स्वतंत्र असल्याचे मतदेखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे इनोव्हेशनबाबत स्वतंत्र धोरण ठरविण्याची प्रक्रीया सुरू आहे.

          नाशिक इंजिनिअरींग क्लस्टरमध्ये चांगले काम होत असून उद्योजकांना विविध औद्योगिक सेवा देताना क्लस्टर सामायिक सुविधा केंद्राची भूमिका पूर्ण करत आहे. यामुळे नाशिक क्लस्टर राज्यातील अमरावती, पुणे, नागपूर अशा इतर क्लस्टरसाठी महत्वपूर्ण  आणि तेवढेच मार्गदर्शक आहे. नाशिक मध्ये स्टार्ट अप व्हिलेज, संशोधन केंद्र अशा मागण्या असून त्याबाबतही शासन पातळीवर विचार केला जाईल, असे श्री. गुप्ता यांनी सांगितले.
          श्री.राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग असून त्यांच्या गरजा पूर्ण तरताना अनेक छोट्या उद्योजकांना काम मिळते. मात्र लघुउद्योजकांनी त्यावरच न थांबता नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे. नाशिकमध्ये ‘इनोव्हेशन हब’ देखील विकसीत व्हावे असा प्रयत्न केला जात आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहित करण्याचे शासनाचे  धोरण आहे.  या अनुषंगाने डिजीटल शिक्षण देणाऱ्या सुविधायुक्त स्कूल, टेलिमेडीसिन मधील महत्वपूर्ण असे डायग्नोस्टीक टूल आदींचा वापर वाढवण्याकडे भर दिला जात आहे.
          खासदार गोडसे म्हणाले, ‘स्टार्ट अप’ संकल्पना  जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेऊ शकते. राज्याच्या विकास धोरणाच्या माध्यमातून  जिल्ह्यात जास्तीत जास्त विकास साधण्यात येईल. यासाठी संशोधन केंद्र, स्टार्ट अप व्हिलेज आदी माध्यमातून काम केले जावे.
          याप्रसंगी त्यांनी नवसंशोधक व उद्योगांद्वारे मांडलेल्या संशोधन संकल्पना प्रकल्पांची पाहाणी करुन माहिती जाणून घेतली.
           नाविन्यपूर्ण उपक्रमांचाइनोव्हेशन डे


 ‘इनोव्हेशन डे’ च्या निमित्ताने आयोजित प्रदर्शनात स्पर्धेच्या युगात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाची चुणूक  दाखवली. आपल्या वैज्ञानिक कौशल्याच्या सहाय्याने त्यांनी  अभिनव  प्रकल्प सादर केले.
इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि आयटी अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी  यात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये व्हि.एन.नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, के.के.वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ब्रम्हा व्हॅली  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टिएमईडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संडे व इस्पायर शाळा इत्यादी विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी आहेत.
टिएमईडी या महाविद्यालयाच्या ‍ विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध तसेच वैद्यकिय उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांचे औषध वेळवर घेता यावे म्हणून ‘डिजीटल एम्पॅक्स स्केअर’ हे यंत्र तयार केले. या यंत्रामुळे अलार्मच्या सहाय्याने रुग्णांना औषधे मिळतील आणि औषधे घेतली कि नाही हे मोबाईल वरील संदेशाने रुग्णांच्या  कुटुंबियांना समजेल.
संघवी  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून पेट्रोल चोरी तसेच पेट्रोल गाडीमध्ये व्यवस्थित भरले गेले की नाही याचे उत्तर मिळते.  ‘स्मार्ट टँक’ या उपकरणाद्वारे  पेट्रोलचे मोजमाप ते गळती यासंदर्भात तत्काळ संदेश संबधितांना मिळत असतो.

ब्रम्हा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने दुचाकी वाहनामध्ये एकाचवेळी दोन इंजिन लावुन वेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकास स्पोर्टस बाईक आणि साध्या बाईकचा आनंद घेता येईल.
एनडिएमव्हीपी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर ऑपरेटिंग ‘थ्री इन वन ॲग्री मशिन’ तयार केले आहे. त्यामध्ये कटिंग मशीन, फवारणी यंत्र आणि डस्टिंग यंत्र असे तीन उपकरण एकाच वेळी  सौर ऊर्जेच्या  सहाय्याने चालू शकतात.
          चांदवड येथील एसएनजेबी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी पिकअप  वाहनाद्वारे माल वाहतूकीसाठी हायड्रोलिक सुविधा तयार केली आहे.  नदीच्या काठावरील कचरा काढण्यासाठी रीव्हर क्लिनींग मशीन, भिंतीवरील डागडुजी पाहण्यासाठी व्हॅक्यूम प्रेशर, फ्लोटरच्या सहाय्याने पाण्यावर चालणारी सायकल, मल्‍टी युटिलीटी कुलर फ्रिज, कुलर आणि पिण्याचे पाणी, लहान मुलांनी तयार केलेले बॅटरीवर चालणारे कुलर, बुट पॉलिश करणारी यंत्रणा, हायड्रोलिक जेसीबी, क्लिनिंग रोबोट, फिजिओथेरपी सिस्टिम युजिंग कायनेस्ट सेंन्सर अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश आहे.
---

No comments:

Post a Comment