Monday 26 March 2018

दीक्षांत समारंभ


शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा-  डॉ.एम.जी.चांदेकर

नाशिक, 26 : दूरशिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त केलेल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग व्यावसायिक प्रगतीबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करावा आणि अध्ययनशील समाजनिर्मितीत आपले योगदान द्यावे,  असे आवाहन संत गाडगे महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. चांदेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 24 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायूनंदन, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू राम ताकवले, कुलसचिव दिनेश बोंडे, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुंळे तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

श्री.चांदेकर म्हणाले, देशात संगणक तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातदेखील  संगणक,  स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आवश्यक मनोवृत्ती तयार करण्यात विद्यापीठांची  भूमीका महत्वाची आहे. विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, विकास आणि त्याचे फायदे यांना स्थान देणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी दूरशिक्षण पद्धतीने पुढे येणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढविण्याचीदेखील गरज आहे. दूरशिक्षण पद्धतीने समाजातील अशा गरजांची नोंद घ्यावी आणि त्या गरजा पूर्ण करणारे शिक्षणक्रम तयार करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, मुक्त शिक्षण पद्धती समाजाभिमुख असावी. पारंपरिक नियमांनी या शिक्षणपद्धतीला जखडल्यास या पद्धतीचा लाभ सामान्य जनतेला होणार नाही. दूरशिक्षण पद्धतीकडे एक पर्याय म्हणून नव्हे तर समाजाच्या आर्थिक रचनेत, सामाजिक रचनेत योगदान कायम ठेवून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था म्हणून पाहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. ताकवले म्हणाले, विज्ञानयुगाने डिजीटल  युगाच्या निर्मितीचा मार्ग शोधण्याबरोबर मार्ग संश्लेषण पद्धतीवर आधारीत एकत्रित आणि एकात्मिक विचार संस्था व समाज यांचा पूर्णत्वाचा विचार करण्याचा विवेकही दिला आहे. म्हणूनच 21 वे शतक सर्वसामान्य लोकांचे आहे. नव्या युगाचे पुनर्गठन तंत्रज्ञान व मानवी गरजा यावर आधारीत राहणार आहे. अशावेळी मुक्त विद्यापीठाने आपले उद्दीष्ट ‘लोकविद्यापीठ’ स्थापण्याचे ठेवून प्रासंगिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.
 मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वाध्याय, सहाध्याय आणि ‍निर्मितीवर भर असून शिक्षण आणि सामाज विकास यांच्यात एकात्मिक संबंध जोडला आहे. त्यातील विकासाचा मार्ग शिक्षणास दाखवावा लागणार असल्याचे ते म्हणाले. सामान्यातील असामान्यत्वाला वाव देणारे शिक्षण असावे, असेही डॉ.ताकवले म्हणाले.

कुलगुरु डॉ.वायुनंदन यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. विद्यापीठाने ई-गव्हर्नन्सवर भर दिला असल्याचे नमूद करून पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची सुविधा चालू वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभात एक लाख 54 हजार 440 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ.ताकवले यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. यशस्वी स्नातकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व पदवी प्रदान करण्यात आली. 31 अभ्यासकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली, तर 43 स्नातकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
----


No comments:

Post a Comment