Tuesday 6 March 2018

पोलिओ लसीकरण


पोलिओ लसीकरण मोहिम 11 मार्च रोजी

नाशिक, 6 : जिल्ह्यात 11 मार्च रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (महिला व बालविकास)डी.बी.मुंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
श्री.राधाकृष्णन म्हणाले, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात शंभर टक्के लसीरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. स्थलांतरीत वस्तीतील प्रत्येक मुलाचे लसीकरण होण्यासाठी मोहिमेच्या संपुर्ण कालावधीत स्थळभेटी द्याव्यात. लसीकरण केंद्रावर उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कमलाकर लष्करे यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची माहिती दिली. 2018 मध्ये पाकीस्तानमध्ये 11 आणि अफगाणिस्तानमध्ये 4 ठिकाणी पोलिओचे जंतू आढळले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भारतात शेवटचा पोलिओचा जंतू  जानेवारी 2011 मध्ये हावडा येथे आढळला होता. देशातून पोलिओ  कायमस्वरुपी घालविण्यासाठी लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000
           


No comments:

Post a Comment