Saturday 10 March 2018

बालमहोत्सव 2017-18


विभागीय स्तर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे विंचुर गवळी येथे उद्घाटन

नाशिक, दि 10 :- महिला व बालविकास विभाग अंतर्गत नाशिक विभागीय उपआयुक्त कार्यालयातर्फे विंचूर गवळी येथील नवजीवन पब्लिक स्कुल येथे आयोजित विभागीय स्तर चाचा नेहरु बालमहोत्सव 2017-18 चे उद्घाटन महिला व बालविकास आयुक्त लहूराज माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
          कार्यक्रमाला बाल हक्क आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, आरोग्य उपसंचालक डॉ.लोचना घोडके, माहिती उपसंचालक डॉ.किरण  मोघे, नवजीवन फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष देशमुख, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त बी.टी.पोखरकर, चंदुलाल शहा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना श्री.माळी म्हणाले, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी. प्रतिकूल विचार बाजूला सारून कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश निश्चितपणे मिळेल. मनात जिद्द असल्यास सामान्य परिस्थितीतून मार्ग काढता येतो. जिद्दीने पुढे जाताना एकमेकांचे नातलग बनून प्रेम द्यावे, शासन पालकत्वाची जबाबदारी पुर्ण करीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.
          डॉ.घोडके यांनी अनाथालयातून बाहेर पडलेल्या यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करावे, असे सांगितले.

          यावेळी श्री.देशमुख आणि श्री.शिंदे यांनीदेखील विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.पोखरकर यांनी  बालमहोत्सवात नाशिक विभागातील 350 विद्यार्थी 14 क्रीडाप्रकारात सहभागी होतील अशी माहिती दिली. अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या कला आणि क्रीडागुणांना वाव देण्यासाठी 2012 पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 अनाथालयातून बाहेर पडून विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या संदीप भालेराव, मनोज पवार, उन्नती बर्वे, माया व्यवहारे, कविता साळुंके यांनीदेखील आपले अनुभव मनोगतातून मांडले. त्यांचा श्री.माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच  ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी  विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजेत्यांची नावे- वक्तृत्व स्पर्धा- रुपाली गिरवले अहमदनगर (प्रथम), वैशाली साठे नाशिक (द्वितीय), निबंध लेखन- धनश्री गायके निफाड (प्रथम), मयुरी पंडीत नाशिक (द्वितीय), घोषवाक्य स्पर्धा-सविता बागूल मालेगाव (विभागस्तर प्रथम व राज्यस्तर द्वितीय), पथनाट्य स्पर्धा विभागून- वनिता शिंदे आणि ग्रुप नाशिक व शरयु ठाणगे व ग्रुप अहमदनगर
----

No comments:

Post a Comment