Monday 6 March 2017

बचतगट वस्तू प्रदर्शनाला प्रतिसाद

 विभागीय बचतगट वस्तू प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद


नाशिक, दि.6: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि नाशिक विभागातील सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित  विभागातील महिला स्वयंसहाय्यता बचत समुहांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या भव्य वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या घरगूती मसाले आणि इतर खाद्यपदार्थांना विशेष मागणी आहे.

 प्रदर्शनात ओली हळद, भाजीपाला, द्राक्षे, विविध प्रकारची लोणची, पापड, कुरडाया, मिरगुंडे, बैलांचा साज, शेतीसाठी लागणारे साहित्य, ज्वारी, बाजरीच्या लाह्या, टॉयलेट क्लिनर, तांदूळ, लोकरीचे कार्पेट, कांबळ, तयार कपडे, डाळीचे वडे, उपवासाचे पदार्थ, चटण्या, मिरची पावडर, मसाले, मुसळी, सरबत आणि जॅमचे विविध प्रकार, विविध चवींची घरगुती तयार केलेली बिस्कीटे, मनूका आदी विविध वस्तू उपलब्ध आहेत. सागवान आणि बांबूने तयार केलेली बैलगाडीची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली आहे. इमिटेशन ज्वेलरीकडेदेखील ग्राहक आकर्षित होत आहे. विविध वनौषधीदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सेंद्रीय गुळ आणि सेंद्रीय भाज्यांनादेखील चांगली मागणी आहे.


 नाशिकच्या खवय्यांसाठीदेखील प्रदर्शनात खास पदार्थ आहेत. खापरावरचे मांडे, भाजणीची दशमी, थालीपीठ, वडे, कळण्याची भाकरी-भरीत, पेठ-सुरगाणा भागातील गावराण कोंबडीची चवदेखील इथे चाखण्याची संधी आहे. अस्सल ग्रामीण पदार्थांची चव चाखण्यासाठी प्रदर्शनात गर्दी होत आहे.

प्रदर्शनामुळे ग्रामीण महिलांना  आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शांता टिळे यांच्या भाजणीच्या थालीपीठाला प्रत्येक प्रदर्शनात मोठी मागणी असते. त्या विधवा असून आई आणि मुलीसह राहतात. अशा प्रदर्शनांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलांय. मुंबई  येथे नुकत्याच झालेल्या ‘सरस’ प्रदर्शनात त्यांनी एक लाखाची विक्री केली.  भाजणीच्या पीठालादेखील मुंबईतून चांगली मागणी असल्याचे त्या आनंदाने सांगतात. नाशिकलाही त्यांच्या थालीपीठांची चव ग्राहकांना आवडते आहे.

खापरावरचे मांड्यांची चव चाखण्यासाठी आणि ती कला पाहण्यासाठी कळवणच्या धनदायी माता महिला बचतगटाच्या स्टॉलजवळ  नागरिक येत आहेत. गतवर्षी तयार पुरणपोळ्यांची चांगली विक्री झाल्याने मांडे प्रदर्शनातच तयार करून विकण्याची कल्पना सुचल्याचे या महिलांनी सांगितले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे बचतगटांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिलांचा नाश्ता, जेवण, निवास व्यवस्था सर्व मोफत करण्यात येत आहे. निवासाच्या ठिकाणाहून प्रदर्शनस्थळी ने-आण करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनामुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांना व्यवसाय वाढविण्याची प्रेरणा मिळते आहे. प्रदर्शनात सीसीटीव्हीची देखील व्यवस्था आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

आतापर्यंत प्रदर्शनात सुमारे 20 लाखाची विक्री झाल्याचे सहाय्यक प्रकल्प संचालक संजय माळी यांनी सांगितले. प्रदर्शन 10 मार्च पर्यंत सुरू असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन बचतगटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment