Friday 3 March 2017

डिजीधन मेळा

 डिजीधन मेळाव्याच्या माध्यमातून मिळाला
कॅशलेश व्यवहाराचा गुरुमंत्र    


            नाशिक दि.03: सतत रोकड व्यवहार करण्याची सवय लागलेली आपली मानसिकता आता बदलू लागतेय, याचा प्रत्यय नाशिकमध्ये आयोजित डिजीधन मेळाव्यात अनुभवावयास मिळाला.  अगदी विद्यार्थ्यांपासून ते व्यापारी, तरुण वर्ग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांनीही या मेळाव्यास प्रत्यक्ष भेट देऊन रोकडरहित व्यवहाराचा अर्थात कॅशलेश व्यवहाराचा मंत्र समजावून घेतला.

 विविध बॅंका, व्यापारी आस्थापना आणि शासकीय विभागांसोबतच ग्रामीण जीवनाशी निगडीत व्यवहारांना प्राधान्य देणाऱ्या व्यवसायांचे स्टॉल्स हे या डिजीधन मेळाव्याचे वैशिष्‍ट्य ठरले.
          जिल्हा प्रशासनाच्यावतीने रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन येथील ठक्कर डोम येथे करण्यात आले होते.  सर्व नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती व्हावी, अशाप्रकारे त्यांना व्यवहार करता यावेत आणि रोख व्यवहारांच्या माध्यमातून औपचारीक अर्थव्यवस्थेचा विस्ताराबाबत त्यांनी माहिती द्यावी, असा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून झाला. विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले.

          संगणकीय व्यवहार कसे होतात, विविध पेमेंट ॲपच्या माध्यमातून व्यवहार कसे होतातखरेदी करताना पैसे कॅशलेस पद्धतीने कसे हस्तांतर करायचे याचे प्रात्यक्षिक या डिजीधन मेळाव्यात पाहायला मिळाले. विविध राष्ट्रीयकृत, व्यापारी, व्यावसायिक बॅंकांनी त्यांचे स्टॉल्स या ठिकाणी मांडले होते. त्यांचे प्रतिनिधी स्टॉल्सवर येणाऱ्या नागरिकांना बॅंकांच्या विविध योजना, ठेवींची माहिती, कर्ज प्रकरणे आणि कॅशलेस व्यवहारांची माहिती देताना दिसत होते. कॅशलेस व्यवहारांची माहिती घेताना सर्वसामान्य नागरिक आणि अगदी विद्यार्थीही ती मनापासून समजावून घेत होते.  ते समजावून घेताना अरेच्चा... कॅशलेस व्यवहार किती सोप्पं आहे. आम्ही आता याच पद्धतीने व्यवहार करणारअशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिल्या. विश्वास को-ऑपरेटीव्ह बॅंकेने स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पिगी बॅंकदेऊन त्यांचे अनोखे स्वागत केले आणि कॅशलेस व्यवहारांचे महत्वही पटवून सांगितले.

          या डिजीधन मेळाव्यात मांडण्यात आलेल्या स्टॉल्सवर कॅशलेस व्यवहार करण्यात आले, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य!
          डिजीधन मेळाव्यात आलेल्या विविध क्षेत्रातील समाजघटकांशी संवाद साधल्यावर हे कॅशलेश व्यवहार किती सोपे आणि व्यवहारात किती उपयुक्त आहेत, याचीच प्रचिती आली.
          नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या अमोल मूर्तडक आणि प्रतीक आगवणे यांची प्रतिक्रियाही अगदी बोलकी! सारे जग आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या व्यवहाराला प्राधान्य देत आहे. त्यामुळे आपल्या देशातही आता या व्यवहारांचे महत्व पटू लागले आहे. रोकड व्यवहारांपेक्षा कॅशलेस व्यवहार सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे सर्वांना पटणारेच आहे, एवढे नक्की!

          चाळीसगाव येथून दिलीप बाफना हे व्यापारी खास या डिजीधन मेळाव्यासाठी येथे आले होते. त्यांनी हे प्रदर्शन आवर्जून पाहिले, विविध स्टॉल्सवरील माहिती घेतली. तेव्हा त्यांना कॅशलेसचे महत्व पटले. मी माझ्या व्यवहारात बॅंकांचे व्यवहार धनादेशाद्वारे करतो. मात्र, दैनंदिन व्यवहारात अजून कॅशलेश पद्धतीचा उपयोग केला नाही. मात्र, येथून गेल्यावर आता नक्की कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देणार. कारण, त्याचे महत्व मला पटलेय, असे त्यांनी सांगितले.
          विशेष म्हणजे, या मेळाव्यात निफाड तालुक्यातील विंचूर येथील वैशाली गांगुर्डे यांनी त्यांचा मनुके विक्रीचा स्टॉल मांडला होता. या मेळाव्यात त्यांनी कॅशलेस व्यवहाराद्वारे या मनुक्यांची विक्री केली. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या, अशा कॅशलेस व्यवहारांमुळे आता रोकड रक्कम जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे सुरक्षितता वाढते. पैसा थेट खात्यात जमा होत असल्याने काही चिंता नाही, अशी प्रतिक्रिया वैशालीताईंनी नोंदवली.

          माधुरी लाड या शिक्षिका या प्रदर्शनास आल्या होत्या. बॅंकींग व्यवहार करत असले तरी फंड ट्रान्स्फर, पेमेंट ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर केला नव्हता. मात्र, या प्रदर्शनात बॅंकांच्या प्रतिनिधींनी  त्यांचे ॲप डाऊनलोड कसे करायचे हे सांगितले. त्याचा वापर किती सुरक्षित आहे, हे समजावले. त्यामुळे माझ्या मनातील कॅशलेस व्यवहारांच्या बद्दल असणारा गैरसमज दूर झाल्याचे श्रीमती लाड यांनी सांगितले.
          आरती खर्डे ही एका खाजगी कंपनीत काम करणारी युवती. तिनेही या मेळाव्यास भेट दिली. अतिशय उपयुक्त माहिती देणारे प्रदर्शन. यापूर्वी माझ्या मनात कॅशलेस व्यवहारांसंबंधी असणारी भीती या मेळाव्यातून दूर झाली, या तिच्या भावना. खरेतर, या मेळाव्यास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील प्रातिनिधीक भावनाच तिने बोलून दाखविली. कॅशलेस व्यवहारांना चालना देणारी ही भावना आता वाढीस लागते आहे. या व्यवहारांचा दैनंदिन जीवनातील वापर वाढतो आहे. हा वापर ही आता जणू प्रत्येकाची सवय बनणार आहे. त्यामुळेच सुरक्षित आर्थिक व्यवहारांचा  वापर करण्यासाठी आता प्रत्येकाची वाटचाल त्यादिशेने सुरु आहे. डिजीधन मेळावा हा या सर्वांना त्यासाठी उत्तम मार्गदर्शकाचे काम करुन गेला, हीच भावना या मेळाव्यास भेट देणाऱ्या प्रत्येकाची होती.

                                                          ****

No comments:

Post a Comment