Friday 24 March 2017

शेत बहरले

शेत बहरले…

कृषी विभागामार्फत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कोरडवाहू क्षेत्र विकास योजना राबविल्याने शेती उत्पादन पद्धतीत बदल घडवून आणल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली गावपरिसरात प्रथमच रब्बीचे पीक बहरलेले दिसत आहे. तुकाराम शिंदेसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यामुळे लक्षणीय भर पडली आहे.

गावात खरीपातील भात किंवा नागलीचे पीक झाल्यावर माळरान ओस पडायचे. ग्रामस्थांना रोजगाराचा कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. काही मंडळी रोजगार शोधण्यासाठी बाहेर जायची. कृषी विभागाने गतवर्षी या गावात एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाण्याचे पाईप, इलेक्ट्रीक मोटार आणि डिझेल इंजिनचे वाटप केले. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाकडे वळण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे खरीपानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन सुरू केले आहे.

तुकाराम शिंदे या 35 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला नागली, खुरसणीचे पीक घेऊन वर्षाला 20 हजारापर्यंत उत्पन्न मिळायचे. इतरही लहानमोठे रोजगाराचे मार्ग शेाधून कुटुंबाची उपजिवीका भागवावी लागे. कोरवडवाहू क्षेत्र विकास योजने अंतर्गत पाईप आणि  पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मल्चिंगसाठी अनुदान मिळाल्यावर त्यांनी साडेपाच एकर क्षेत्रात टमाटे, वांगे, कारले अशी पीके घेण्यास सुरूवात केली आहे. आज त्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत पोहोचले आहे. त्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था करून त्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर असून यापुढे पॉली हाउुस उभे करण्याचा मानस असल्यसाचे शिंदे सांगतात.

कृषी पर्यवेक्षक एस.पी.पाटील, कृषी सहाय्यक शिवचरण कोकाटे आणि अर्चना सातपुते यांनी गावातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे महत्व समजावून देत प्रोत्साहन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा योजना राबविण्यात चांगला सहभाग मिळाला. गावात 28 लाभाथर्यांना पाईप आणि इलेक्ट्रीक मोटार, तीन शेतकऱ्यांना डिझेल इंजिन आणि 23 म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. वाकी धरणात यावर्षापासून पाणी अडविण्यात आल्याने त्याच्या बॅकवॉटरचा पुरेपूर उपयोग करीत शेतकरी भाजीपाला उत्पादन करीत आहेत.
कृषी विभागाच्या प्रयत्नाने गावात समृद्धी येत असल्यची ग्रामस्थांची भावना आहे. शिवाय कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी गावातील तरुण मंडळीदेखील पुढे येत आहे. हा बदल गावाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा ठरणार आहे.
मनोहर पाचरणे, शेतकरी-पूर्वी भातपीक झाल्यावर झाडाखाली गप्पा करीत बसण्याचेच काम होते. कोणतेही इतर रोजगाराचे साधन नव्हते. कृषी विभागाने कार्यक्रम राबविल्याने आता खऱ्या अर्थाने शिवार बहरले आहे. उत्पादनही वाढले आहे.

No comments:

Post a Comment