Saturday 11 March 2017

वर्तमानपत्राचा कागद अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरू नये

वर्तमानपत्राचा कागद अन्नपदार्थाच्या पॅकींगसाठी न वापरण्याच्या सुचना
नाशिक दि.11-वर्तमानपत्राच्या रद्दीचा स्पर्श झालेले अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी हानीकारक असल्याने अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी, पॅकींगसाठी, अन्न पदार्थातील तेल शोषून घेण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद  वापरू नये, अशा सुचना दिल्या आहेत.
लहान उपहारगृहे आणि हातगाडीवाल्यांकडून वर्तमानपत्राचा कागद अन्नपदार्थ ठेवण्यासाठी व खाण्यासाठी सरसकट वापरला जातो. वर्तमानपत्रासाठी वापरली जाणारी शाई आरोग्यासाठी मोठ्याप्रमाणात घातक आहे. या शाईमध्ये मानवी आरोग्याला हानीकारक रंग, रंगद्रव्ये, चिकटपणा आणणारे पदार्थ आणि विविध रसायने असतात. त्याचबरोबर रद्दीत रोगराईला कारणीभूत ठरणारे विषाणूदेखील असतात.
 वर्तमानपत्राच्या कागदावर विविध जड धातू अल्प प्रमाणात असल्याने पचनाला अडथळा निर्माण होतो. वयोवृद्ध व्यक्ती, बालके आदी रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना अशा विविध घटकांमुळे कॅन्सरसारख्या रोगाची लागण होऊ शकते. त्यामुळे व्यासायिक आणि हातगाडीवाले तसेच इतर विक्रेत्यांनी गुंडाळण्यासाठी, पॅक करण्यासाठी किंवा खाण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा उपयोग थांबवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उ.श.वंजारी यांनी केले आहे.

-----

No comments:

Post a Comment