Thursday 16 March 2017

महसुल अदालत

महसुल अदालतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
                                                                   -दिलीप स्वामी

मालेगाव,  दि. 16 :- शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या महाराजस्व अभियानातंर्गत शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल अदालत उपयुक्म उपक्रम असून या माध्यमातून शेतकऱ्यांना त्वरीत न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
मालेगांव येथील अपरजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराजस्व अभियानातंर्गत  आयोजित महसुल अदालतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस ए.एस.एम.अली, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.देवरे, चांदवड येथील उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, तहसिलदार डॉ.सुरेश कोळी, चंद्रकांत देवगुणे, शरद मंडलिक, नायब तहसिलदार रवींद्र सांयकर, एस.एन.पाटील आदी उपस्थित होते.

श्री.स्वामी म्हणाले, जनतेच्या जास्तीत जास्त समस्यांचे निराकारण व्हावे हा या महसूल अदालतीचा उद्देश असून या अदालतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व मानसिक त्रासही कमी होणार आहे. या अदालतीमध्ये प्रलंबित अपीलांचा तडजोडीने व समोपचाराने निपटारा करण्यात येणार आहे.  तसेच सुनावणीच्या आधारे जलद गतीने न्यायनिवाडा करण्याचे कामकाज होणार असून येत्या 31 मार्च एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसुल खटल्यामंध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय महत्वाचे असून उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील दुवा आहे. या अभियानातंर्गत  शेतजमिनी विषयीचे एकुण 120 खटले निकाली निघणार आहेत.  जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून जनतेने महसूल अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.स्वामी यांनी केले.
महसुल अदालत अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी  आपल्या अपीलांबाबत तडजोड करुन आपला अमूल्य वेळ, पैसा व श्रम वाचवावे  आणि जलदगतीने होणाऱ्या निर्णयांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.अली यांनी केले.
श्री.देवरे, तहसिलदार श्री. कोळी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी , कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****************

No comments:

Post a Comment