Wednesday 15 March 2017

रक्तदान शिबीर

रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान-राधाकृष्णन बी.


          नाशिक दि. 15 :- रक्तदानामुळे  रुग्णांना अडचणीच्या वेळेस रक्त उपलब्ध करून देणे शक्य होते आणि त्यांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे किमान सहा महिन्यात एकदा रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधीकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
नाशिक जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  शिबीरात 60 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या रक्तदानातून 60  पिशव्या रक्त संकलीत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधीकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधीकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुरेश जगदाळे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पी.वाय.देशपांडे, कार्याध्यक्ष योगेश्वर कोतवाल, सरचिटणीस नरेंद्र जगताप, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे कौतुक केले. रक्तदानाबाबत गैरसमज दूर करणे गरजेचे असून त्याबाबतची माहिती अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. तसेच गरजेच्यावेळी  गरजूंना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रक्तगटाची माहिती संकलीत करून ठेवावी, अशी सुचना त्यांनी केली. 
जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.जगदाळे म्हणाले, महिलांना प्रसुतीच्या वेळी अनेकदा रक्ताचा तुटवडा भासतो. त्यासाठी नागरीकांनी शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत आयोजीत शिबीरात रक्तदान केल्यास रक्ताची गरज भागू शकेल. त्यासाठी अशा रक्तदान शिबीरांना मोठा प्रतिसाद मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.  आरोग्य विभागातर्फे हिमोग्लोबीन, रक्तदाब, रक्तगट तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसचे रक्तदानासंबंधी समुपदेशन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे,  रक्त संक्रमण  अधिकारी डॉ.पवनकुमार बर्दापूरकर, डॉ.मिलींद कौशिक,  निवासी वैद्यकीय अधिकारी  डॉ.अनंत पवार, जिल्हा संघटक दिनेश वाघ, उपाध्यक्ष विठ्ठल मोराणकर, दिनेश पराडकर, सहसचिव गणेश लिलके, पोपट सोनवणे आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

                                    000000

No comments:

Post a Comment