Tuesday 21 March 2017

रोजगार मेळावा

रोजगार मेळावा ही युवकांसाठी सुवर्णसंधी राधाकृष्णन बी.
         

नाशिक दि.21 –युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित मेळावा ही युवकांसाठी सुवर्णसंधी असून आपल्या या संधीचा उपयोग करून घेत युवकांनी चांगला अनुभव प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
 दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान आणि कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‍विभागीय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, उपमहापौर प्रथमेश गीते, कौशल्य विकास संचालक संपत चाटे, मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर आदी उपस्थित होते.
   जिल्हाधिकारी म्हणाले, रोजगाराचे कोणतेही क्षेत्र निवडताना युवकांनी आपल्या क्षमतेचा पुर्ण उपयोग करावा. मेळाव्यात नियुक्ती न झाल्यास निराश न होता त्रुटी दूर करण्याचा आणि अधिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या 36 प्रकारच्या  प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाकडून विविध उद्योगांना आवश्यक मनुष्यबळाची माहिती घेण्यात येणार असून त्यावर आधारीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

महापौर श्रीमती भानसी  यांनी मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून देण्यसासाठी पुढे आलेल्या उद्योगांचे आभार व्यक्त केले. अशा उद्योगांमुळे युवकांना संधी मिळण्याबरोबरच शहराच्या विकासालाही चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. यापुढेदेखील अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
बेरोजगार युवक-युवतींसाठी महानगरपालिकेतर्फे दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावे भरवण्यात येणार असल्याचे सांगून श्री.कृष्णा  म्हणाले,  बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी  महापालिका प्रयत्नशील राहणार आहे. मेळाव्यात वेगवेगळे 40 कक्ष स्थापन करण्यात आले असून  मुलाखतीनंतर  निवड झालेल्या प्रतिनीधींना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रोजगार मिळण्यासाठी ज्ञान आणि अनुभव मिळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगार मेळाव्यात 22 मार्च रोजी ट्रेनी, सेल्स एक्झ‍िक्युटीव्ह, सिक्युरीटी सर्व्हिसेस, नर्सिंग, सिस्टर, वॉर्डबॉय, स्वीपर, लॅब टेक्निशिअन, पीआरओ, जीएनएम, वॉचमन, आया मावशी, स्टाफ नर्स अशा एकूण 1189 पदांसाठी  अकरा संस्थांमार्फत महात्मा फुले कलादालन येथे चाचणी व मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक कौशल्य विकास यांनी केले आहे.

----

No comments:

Post a Comment