Tuesday 28 February 2017

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम

             संगणक आणि महाजालावर मराठीचा अधिकाधीक उपयोग करा                                                                -प्रा.व्ही.एन.सुर्यवंशी


            नाशिक दि.28:युवकांनी  मराठी भाषेच्या संवर्धन आणि उत्कर्षासाठी संगणकीय प्रणाली आणि महाजालावर मराठीचा अधिकाधीक उपयोग करावा, असे मत एच.पी.टी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
          जिल्हा माहिती कार्यालय नाशिक  आणि एचपीटी महाविद्यालयाच्या  मराठी व पत्रकारीता विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव  दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, प्रा.वृंदा भार्गवे, प्रा. अनंत येवलेकर उपस्थित होते.
          श्री. सुर्यवंशी म्हणाले, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे राष्ट्र प्रगतीच्या वाटेवर पुढे जात आहेत. संगणकीय महाजालावर इतर भाषांमधील ज्ञान जेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे तेवढ्या प्रमाणात मराठीत नाही. मराठी संस्कृतीच्या‍ विकासासाठी मातृभाषेचे महत्व लक्षात घेता  महाजालावर मराठीचा ठसा उमटविणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी विविध विषयांची माहिती संकेतस्थळ, ब्लॉग, विकीपिडीयाच्या माध्यमातूनक महाजालावर आणावी, असे आवाहन त्यांनी केले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या भूमीतले विद्यार्थी म्हणून मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

          डॉ.मोघे यांनी शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले,समाजमाध्यमाद्वारे मराठी भाषा गौरव दिनाची चर्चा होत असताना संगणक आणि महाजालावर मात्र मराठी शब्दांची माहिती मर्यादीत प्रमाणात आहे. काही संकेतस्थळांनी मराठी साहित्यलोकजीवन आणि संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचविण्यात चांगले योगदान दिले आहे. मात्र मातृभाषेच्या विकासासाठी अधिकाधीक संशोधनाद्वारे व्यापक माहिती महाजालावर टाकण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. आपले शहर, परिसर, संस्कृती, महाविद्याय, पर्यटनस्थळे आदी विषयासंदर्भात विकीपीडियावर एक परिच्छेद लिहून मराठीच्या विकासात आपलेही योगदान देणे शक्य आहे. येत्या काळात संगणकीय प्रणाली आणि महाजालाचे माहिती प्रसारणात महत्व लक्षात घेता संवादासाठी भाषेचे महत्व टिकवून ठेवताना तीचा महाजलावर अधिकाधीक उपयोग करणे महत्वाचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
          श्रीमती भार्गवे यांनी पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून नाशिकच्या संस्कृतीचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली. मराठी भाषेतून उपयुक्त माहिती व शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकराज्य मासिकाचे योगदानही महत्वाचे असल्याची त्यांनी सांगितले.
          कार्यक्रमास महाविद्यालयातील पत्रकारीता व मराठी विभागाचे विद्यार्थी प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी  विद्यार्थ्यांना लोकराज्य अंक भेट देण्यात आले.

***********

No comments:

Post a Comment