Monday 27 February 2017

सार्वजनिक बांधकाम विभाग आढावा बैठक

सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू करा-चंद्रकांत पाटील


नाशिक, दि. 27 : गतवर्षी आलेल्या पूरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सचिव सी.पी.जोशी, अजित सगणे, मुख्य अभियंता आर.आर.केडगे, अधिक्षक अभियंता आर.आर. हांडे, सी.डी.वाघ, पी.बी.भोसले, आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, विविध कामांची प्रलंबित देयके त्वरीत अदा करण्यासाठी त्वरीत आवश्यक कार्यवाही करावी. कमकूवत पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी विहीत प्रक्रीयेद्वारे संस्थेची निवड करण्यात यावी जेणेकरून गरजेनुसार दुरुस्तीची कामे तातडीने करणे शक्य होईल. रस्ते दुरूस्तीसाठी दहा किलोमीटरचे टप्पे करावे आणि वार्षिक दुरूस्ती करार तत्वावर संस्थेची निवड करून प्रस्ताव सादर करावे. दुरूस्ती केलेले रस्ते वर्षभर सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील, असे त्यांनी सांगितले.
मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध प्रकल्प, नाबार्ड अंतर्गत कामे,  जाहीरात फलक आदी विविध कामांचा आढावा घेतला. दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----
          

No comments:

Post a Comment