Thursday 14 June 2018

13 कोटी वृक्ष लागवड


वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करा-सुधीर मुनगंटीवार
             

       नाशिक दि. 14- वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक स्तरावर ओळख प्रस्थापित व्हावी म्हणून वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक प्रयत्न करा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे 13 कोटी  वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित नाशिक विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वनविभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, मुख्य वनसंरक्षक टी.रामाराव, उपायुक्त अर्जुन चिखले, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
          श्री.मुनगंटीवार म्हणाले, वृक्ष लागवडीसाठी लोकसहभाग वाढवणे महत्वाचे आहे. जनतेचा या अभियानावरील विश्वास वाढावा यासाठी पारदर्शकतेवर अधिक भर देण्यात येत आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय 50 कोटीचे उद्दीष्ट गाठणे अशक्य आहे. त्यामुळे उत्तम नियोजन  आणि लोकसहभागावर अधिक भर देण्यात यावा. त्यासाठी हरितसेना सदस्य नोंदणीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. मानवी जिवनाच्या अस्तित्वासाठी वृक्ष संवर्धन महत्वाचे असल्याची जाणीव नागरिकांच्या मनात निर्माण होणेदेखील महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

          वनमंत्री म्हणाले, 2016 मध्ये 2 कोटी 82 लक्ष आणि 2017 मध्ये 5 कोटी 43 लाख वृक्ष लागवड करण्यात आली असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. यावर्षी 13 कोटी वृक्ष लावण्यात येणार असल्याने अधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेणे गरजेचे आहे. वन संरक्षणासाठी शासनाने 1926 या टोल फ्री क्रमांकावर हेल्पलाईन सुरू केली असून आतापर्यंत 45 हजार तक्रारींची नोंद झाली आहे. तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या वनस्थिती अहवालात महराष्ट्र चार घटकात  प्रथम क्रमांकावर आहे. वनेत्तर क्षेत्रात वृक्षाच्छादन 273  चौ.किमीने वाढले आहे.  कांदळवनाच्या क्षेत्रात 82  चौ.किमीने वाढ झाली आहे. शासनाने बांबू टी.पी.  फ्री असून त्यामुळे बांबूचे क्षेत्र 4462 चौकिमीने वाढले आहे. वनक्षेत्रातील जलसाठे 432 चौ.किमीने विस्तारले आहे. वनाचे महत्व लक्षात घेऊन अभियानात लोकप्रतिनिधी, विविध शासकीय व अशासकीय संस्था आणि समाजातील विविध घटकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

वणवा रोखण्यासाठी विविधि प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत असून वणवा प्रतिबंधाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज अकादमी उभारण्यात येत आहे. तसेच त्यासाठी आवश्यक आधुनिक साहित्यदेखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली.
श्री.खारगे म्हणाले, वृक्ष लगावड  उपक्रमात कृषी विभागाचे महत्व अधिक आहे. पडीक जमीनीवर फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावे. नागरिकांनी विविध प्रसंगी वृक्ष भेट द्यावी यासाठी जागरुकता निर्माण करण्यात यावी. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी पारदर्शकतेवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
          वृक्ष लागवड अभियानांतर्गत चालू वर्षी नाशिक जिल्ह्याला 72 लाख 26 हजार, अहमदनगर 49 लाख 94 हजार, धुळे 43 लाख 39 हजार, नंदुरबार 45 लाख 28 हजार आणि जळगाव 42 लाख 41 हजार  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असून 96 टक्के खड्डे खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. नाशिक वन विभागाच्या अधिनस्त 283 रोपवाटिकांमध्ये 440 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. विभागात 6 लाख 82 हजार हरित सेना सदस्यांची नोद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीपूर्वी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विभागातील विविध जिल्ह्यांनी तयार केलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीला विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---

No comments:

Post a Comment