Thursday 21 June 2018

वनमित्र मोहिम

वनहक्क दावे तीन महिन्याच्या आत निकाली काढावेत-राधाकृष्णन बी.

नाशिक दि.21- मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार वनहक्क दावे व अपील तीन महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम, 2006 व नियम 2008 उपविभागस्तरीय समिती सदस्य व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची वनमित्र मोहिम व  प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी अमन मित्तल, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील  प्रशिक्षक राकेश पाटील, कविता गायकवाड आदी उपस्थित होते.  
श्री.राधाकृष्णन म्हणालेअपिलांच्या कालबद्ध सुनावणीसाठी वनमित्र मोहीम शासनातर्फे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून वनहक्क दावे निकाली काढण्याबाबत येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात यावी. सकारात्मक दृष्टीकोनातून दावे व अपिले कालबद्ध मुदतीत निकालीकाढून वनमित्र मोहीम यशस्वी करावी.

 उपविभागीयस्तरीय व वनहक्क समितीने  प्रकरणे निकाली काढतांना त्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वनविभागाने पीओआर रिपोर्टचा आधार न घेता इतर विभागाच्या पुरव्यांचाही विचार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 नाशिक जिल्ह्यात  प्राप्त 50 हजार 443 दाव्यांपैकी 21 हजार 165 दावे मान्य झाले आहे. 9 हजार 551 दावे अमान्य आहेत. जिल्हा समितीकडे प्रलंबित दावे 6 हजार 550 असून उपविभागस्तरीय समितीकडे 12 हजार 503 दावे  प्रलंबित आहेत.  प्रलंबित दाव्यांबाबत तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कार्यशाळेत श्री.पाटील यांनी वनमित्र मोहिमेचा उद्देश, प्रलंबित राहणारे दावे व अपिले यांचे कारणांबाबत उपाययोजनांची चर्चा, नाकारण्यात येणाऱ्या दावे व अपिलांच्या कारणांबाबत व उपाययोजनांची, वनहक्क अधिनियम व नियमातील तरतुदी, वैयक्तिक वनहक्क दावे हाताळणी कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती गायकवाड यांनी, सामुहिक वनहक्क दावे हाताळणी, सामुहिक वनहक्क मार्गदर्शिका, सामुहिक वनहक्क वन व्यवस्थापन, नियोजन आराखडे, वैयक्तिक व सामुहिक वनहक्क धारकांना पट्टे देणे, जमीन मोजणी व सीमाकंन, अधिकार अभिलेख अद्यावतीकरण याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक वनसरंक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
**********

No comments:

Post a Comment